* संघटनांच्या बंदमुळे विद्यार्थी वेठीला
* कायम विनाअनुदानित प्राध्यापकांचाही बहिष्कार
अनेक वेळा बदललेले वेळापत्रक, विविध संघटनांचे बंद, बहिष्कार, असहकार या सगळ्याचे ग्रहण यावर्षी बारावीच्या परीक्षेला लागले आहे. आता कायम विनाअनुदानित प्राध्यापकांनीही बारावीच्या परीक्षांवर बहिष्कार टाकला आहे, तर शासन आणि शिक्षणसंस्था चालकांची चर्चा फिसकटल्यामुळे शिक्षणसंस्थांनीही बारावीच्या परीक्षेबाबत असहकाराची भूमिका कायम ठेवली आहे. बारावीच्या परीक्षेच्या पहिल्याच पेपरच्या दिवशी कामगार संघटनांनी ‘भारत बंद’ पुकारल्यामुळे विद्यार्थ्यांंचेच हाल होणार आहेत.
केंद्रीय कामगार संघटनांनी २० आणि २१ फेब्रुवारीला भारत बंदची घोषणा केली आहे.
२१ फेब्रुवारीपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात होत आहे. या बंदमध्ये वाहतूक कर्मचारी, रिक्षाचालक यांचा सहभाग असल्यामुळे वेळेवर परीक्षा केंद्रांवर पोहोचण्यासाठी विद्यार्थ्यांना कसरत करावी लागणार आहे. विशेषत: मुंबई विभागातील विद्यार्थ्यांचे अधिक हाल होण्याची शक्यता आहे.
 यापूर्वी अनेक वेळा बदलावे लागलेले बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक आता पुन्हा बदलणे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाला शक्य नाही. त्यामुळे भारत बंद असला, तरी परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणेच होणार अशी भूमिका मंडळाने घेतली आहे.

शिक्षणसंस्थांचा असहकार कायम
शिक्षणसंस्थांनी बारावीच्या परीक्षांसंदर्भात पुकारलेल्या बहिष्काराबाबत महाराष्ट्र राज्य शिक्षणसंस्था महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांची शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांच्याशी गुरुवारी चर्चा झाली. मात्र, ही चर्चा फिसकटल्यामुळे बारावीच्या लेखी परीक्षेसाठी वर्ग उपलब्ध करून न देण्याच्या निर्णयावर शिक्षणसंस्था चालक ठाम आहेत. याबाबत महाराष्ट्र राज्य शिक्षणसंस्था महामंडळाचे सरकार्यवाह डॉ. आर. पी. जोशी यांनी सांगितले, ‘‘शासनाने आमच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे बारावीच्या परीक्षांबाबत शिक्षणसंस्थांनी घेतलेली असहकाराची भूमिका कायम राहणार आहे. लेखी परीक्षा सुरू होण्यापूर्वी शासनाने मागण्या मान्य न केल्यास परीक्षेसाठी शिक्षणसंस्थांकडून वर्ग उपलब्ध करून देण्यात येणार नाहीत.’’

शिक्षणमंत्री म्हणतात, सारे ठीक होणार!
शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांनी मात्र, संस्थाचालक, शिक्षक, कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक यांच्या विविध मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली असून, फेडरेशनच्या बैठकीत १८ तारखेला निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे बारावी परीक्षेवरील बहिष्काराची टांगती तलवार दूर झाली असल्याचा दावा गुरुवारी ‘लोकसत्ता’शी बोलताना केला. बंदचाही परीक्षेच्या वेळापत्रकावर कोणताही परिणाम होणार नाही आणि परीक्षेत कोणताही अडथळा येणार नाही, असे  त्यांनी स्पष्ट केले. वेतनेतर अनुदानाच्या थकबाकीचा मुद्दा राहिलेला नाही, असेही दर्डा यांनी सांगितले.