News Flash

संक्रमण शिबिरात न जाण्याचा हट्ट नडला!

याच बिल्डिंगमधील सात कुटुंबीयांनी ट्रस्टनेच बांधलेल्या संक्रमण शिबिरात आसरा घेतला.

भेंडीबाजार येथील हुसैनी इमारत कोसळून २०हून अधिक जणांचा मृत्यू झाला.    (छायाचित्र : निर्मल हरिंद्रन)

स्थलांतर करण्यास नकार देणारी १३ कुटुंबे दुर्घटनेच्या फेऱ्यात

अरुंद गल्ल्या आणि अत्यंत दाटीवाटीच्या भेंडी बाजाराचा कायापालट करण्याचे सैफी बुऱ्हाणी अपलिफ्टमेंट ट्रस्टने २०१० मध्येच ठरविले होते; परंतु २०१४ पर्यंत ट्रस्टला परवानग्याच मिळाल्या नाहीत. त्यानंतर एकूण नऊ क्लस्टरपैकी दोन क्लस्टरचे काम सुरू झाले. अतिधोकादायक असलेल्या ३० इमारती पाडण्यात आल्या होत्या. आणखी १० इमारती पाडण्यात येणार होत्या. मात्र हुसैनी बिल्डिंगचा त्यात समावेश नव्हता. यात वास्तव्य करणारे १३ कुटुंबीय स्थलांतर करण्यास तयार नव्हते. याच बिल्डिंगमधील सात कुटुंबीयांनी ट्रस्टनेच बांधलेल्या संक्रमण शिबिरात आसरा घेतला. त्यामुळे ते वाचले आणि हट्टापायी १३ कुटुंबीय इमारतीच्या ढिगाऱ्यात गाडले गेले.

साडेसोळा एकरवर पसरलेल्या भेंडी बाजारचा पुनर्विकास हा मुंबईतील सर्वात मोठा समूह पुनर्विकास असल्याचा दावा ट्रस्टने केला आहे. मुंबईत आतापर्यंत इतक्या मोठय़ा प्रमाणात प्रत्यक्षात पुनर्विकास सुरू झालेला नाही. त्यामुळे हा समूह पुनर्विकास पहिलाच मानला जात आहे. भेंडी बाजारात तब्बल २५० इमारती आहेत. त्यातून ३२०० कुटुंबीयांचे वास्तव्य आहे. याशिवाय १२५० व्यापारी सदनिका आहेत. तब्बल २० हजार रहिवाशांचा पुनर्विकास ट्रस्टमार्फत करण्यात येणार आहे. २००९ मध्ये ट्रस्टने या प्रकल्पाची घोषणा केली. २०१० मध्ये तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडे सादरीकरण करण्यात आले. परंतु भारतीय जनता पार्टीचे शासन राज्यात सत्तेवर आल्यानंतर २०१४ मध्ये प्रत्यक्षात या प्रकल्पाने जोर धरला.

दाटीवाटीने पसरलेल्या या चाळसदृश परिसरातील इमारती या आता ट्रस्टच्या मालकीच्या आहेत. उपकर भरला जात असल्यामुळे त्या म्हाडाच्या अखत्यारीत होत्या. या समूह पुनर्विकासासाठी ७० टक्क्यांहून अधिक रहिवाशांनी मंजुरी दिल्यामुळे शासनानेही विकास नियंत्रण नियमावली ३३(९) नुसार समूह पुनर्विकासास हिरवा कंदील दाखविला. त्यानंतर ट्रस्टने इमारतींचे संपादन सुरू केले. आतापर्यंत ८७ टक्के संपादन पूर्ण झाले आहे. उर्वरित संपादन रहिवाशांच्या विरोधामुळे रखडले आहे. या रहिवाशांना ३५० चौरस फूट कार्पेट आकाराचे घर मिळणार आहे. त्यामध्ये सर्व अत्याधुनिक सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तरीही रहिवाशांना आणखी मोठे घर हवे आहे. विशेष म्हणजे यापैकी अनेक चाळींमध्ये पागडी पद्धतही होती. हे सर्व रहिवासी भाडेकरू आहेत. मात्र ट्रस्टकडून या रहिवाशांना मालकी हक्क दिला जाणार आहे. मोकळे मैदान, बगीचा, व्यापारी संकुल अशा पद्धतीने नियोजनबद्धरीतीने समूह पुनर्विकासाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प ट्रस्टकडून राबविला जात आहे.

सुरुवातीला अतिधोकादायक असलेल्या सुमारे ३० इमारती पाडण्यात आल्या. या मोकळ्या भूखंडावर इमारती बांधण्यास सुरुवात करण्यात आली. एकूण नऊ विभागांत या पुनर्विकासाची विभागणी करण्यात आली आहे. क्लस्टर एक व तीनचे काम सुरू झाले असून त्यामध्ये उभारण्यात आलेल्या उत्तुंग इमारतीत १२५० कुटुंबीयांना नव्या घराचा ताबा देण्यात आला आहे. रहिवाशांच्या तात्पुरत्या वास्तव्यासाठी सैफी बुऱ्हाणी पार्क ट्रान्झिट इमारतही उभारण्यात आली आहे, तर दुकानांच्या पुनर्वसनासाठी मफद्दल शॉपिंग आर्केड उभारण्यात आले आहे.

हुसैनी इमारत पाडण्याबाबत म्हाडाने मे २०१६ मध्येच परवानगी दिली होती. सात कुटुंबीयांनी ट्रस्टच्या माझगाव येथील ट्रान्झिट इमारतीत स्थलांतर केले होते; परंतु १३ कुटुंबीय स्थलांतर करण्यास तयार नव्हते. त्यांच्याशी चर्चा सुरू होती. आताही त्यांना घरे रिक्त करण्यास सांगण्यात आले होते; परंतु ते ऐकत नव्हते, असा दावा ट्रस्टचे संचालक मुर्तुझा सदारीवाला यांनी केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2017 3:05 am

Web Title: 13 families were not ready to shift from hussain building
Next Stories
1 मानखुर्दमधील विद्यार्थ्यांसाठी शाळेची वाट नाल्यातून
2 मेट्रो कामांमुळे पुरात भर?
3 मिठागरांच्या जमिनी खुल्या केल्यास पुराचे संकट तीव्र
Just Now!
X