10 July 2020

News Flash

‘बेस्ट’ प्रवाशांत १३ लाखांची भर

बेस्टच्या प्रवासी संख्येत वाढ झाली.

(संग्रहित छायाचित्र)

७ महिन्यांत उत्पन्नात मात्र प्रतिदिन ५४ लाखांची घट; महसूलवाढीचे आव्हान कायम

मुंबई : प्रवासी भाडे थेट ५० टक्क्यांनी कमी करत मुंबईकरांना स्वस्तात मस्त प्रवास देणाऱ्या बेस्ट प्रवाशांच्या संख्येत गेल्या सात महिन्यांत १३ लाख ७७ हजार प्रवाशांची (दररोजचे सरासरी) भर पडली आहे. मात्र महसूलवाढीचे आव्हान कायम असून त्यात या काळात प्रति दिन सरासरी ५४ लाखांची घट झाली आहे.

बेस्टने ९ जुलै २०१९ पासून भाडेकपात केली. सध्या बेस्ट पाच किलोमीटरच्या साध्या प्रवासाकरिता पाच रुपये आणि वातानुकूलित प्रवासासाठी सहा रुपये भाडेआकारणी करते आहे. यामुळे बेस्टच्या प्रवासी संख्येत वाढ झाली. भाडेकपातीआधी दररोज सरासरी १९ लाख २३ हजार प्रवासी बेस्टने प्रवास करत होते. हीच संख्या भाडेकपातीनंतर जानेवारी २०२० पर्यंत सरासरी २९ लाख ५ हजारापर्यंत गेली. फेब्रुवारी महिन्यात पॉइंट टू पॉइंट सेवेमुळे त्यात आणखी भर पडली आहे. आता दररोज सरासरी ३३ लाख  प्रवाशी बेस्टने प्रवास करत आहेत. वांद्रे, सांताक्रूझ, देवनार, शिवाजीनगर, घाटकोपर, मुलुंड आगारांतर्गत सुटणाऱ्या बसगाडय़ांना चांगला प्रतिसाद प्रवाशांकडून मिळत आहे.

प्रवासी वाढले असले तरी बेस्टच्या महसुलावर परिणाम झाला आहे. भाडेकपातीपूर्वी बेस्टला दररोज सरासरी २ कोटी ३६ लाख १६ हजार रुपये महसूल मिळत होता. हाच महसूल सरासरी १ कोटी ८२ लाख ११ हजार रुपयांवर आला आहे. बेस्टला दररोजच्या सरासरी ५४ लाख रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागत आहे.

सुट्टय़ा नाण्यांनी बेस्टची तिजोरी भरली

भाडेकपात झाल्यानंतर बेस्टची तिजोरी सुट्टय़ा पैशांनी भरू लागली आहे. बेस्टकडे १२ कोटी रुपयांपेक्षाही सुटी नाणी जमा झाली आहेत. एक रुपया, दोन रुपये आणि पाच रुपयांच्या नाण्यांचा यात समावेश आहे.

 

विनावाहक सेवेचाही फायदा

प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी वातानुकूलित व विनावातानुकूलित मिनी बसगाडय़ा दाखल केल्या. या विनावाहक सेवा ‘पॉइंट टू पॉइंट’ दिल्या जात आहेत. यामुळे प्रवाशांचा वेळ वाचतो. यामुळेही बेस्टच्या प्रवासी संख्येत काही प्रमाणात भर पडल्याचा दावा बेस्टने केला. ही सेवा नोव्हेंबर २०१९ पासून प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली. त्यानंतर याचा विस्तार केला गेला. विनावाहक सेवा सुरू झाल्यानंतर पहिल्या दीड महिन्यातच ३५ हजारपेक्षा जास्त प्रवाशांची भर पडली. त्यात आणखी वाढ होऊन ती लाखभराच्या जवळपास पोहोचली आहे. याला बेस्ट कर्मचारी संघटनांचा विरोध आहे. बेस्टने सुरू केलेली विनावाहक सेवा सध्या ८६ मार्गावर सुरू आहे. यामध्ये ४१ मार्गावर बेस्टच्या स्वमालकीच्या २२४ बस विनावाहक धावत आहेत, तर ४५ मार्गावर भाडेतत्त्वावरील ३२५ बस धावत आहेत.

भाडेकपातीनंतरही ‘फुकटे’ कायम

भाडेकपातीपूर्वी म्हणजेच जून २०१९ मध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्या ३ हजार ४३ जणांवर कारवाई करण्यात आली होती. भाडेकपातीनंतर नोव्हेंबर २०१९ मध्ये ३ हजार ५०७ प्रवाशांवर कारवाई झाली. थोडक्यात भाडेकपातीनंतरही फुकटय़ा प्रवाशांचा त्रास कायम आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 22, 2020 1:37 am

Web Title: 13 lakh added for best passengers akp 94
Next Stories
1 जानेवारीतही स्वाइन फ्लूची बाधा
2 भारतीय संस्कृतीचा ‘अलंकारिक’ ठेवा प्रदर्शनात
3 ध्वनिक्षेपक वापर निर्बंध शिथिल करा!
Just Now!
X