पुण्याच्या आबेदा इनामदार महाविद्यालयाच्या सहलीदरम्यान दुर्घटना
सहलीसाठी पुण्यातून रायगड जिल्ह्य़ातील मुरुड येथे आलेल्या १३ विद्यार्थ्यांचा सोमवारी समुद्रकिनाऱ्यावर बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये १० मुले व ३ मुलींचा समावेश आहे. तसेच, एका बेपत्ता विद्यार्थ्यांचा शोध सुरू असून रात्री उशिरापर्यंत त्याचा ठावठिकाणा लागू शकला नाही.
पुण्याच्या कॅम्प भागातील महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालयातील बॅचलर ऑफ कॉम्प्युटर सायन्स व बॅचलर ऑफ कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन विभागाचे १३० विद्यार्थी सोमवारी तीन खासगी बसमधून मुरुडला सहलीसाठी आले होते. त्यांच्यासमवेत शिक्षकांसह संस्थेचे दहा कर्मचारीदेखील होते. दुपारी तीनच्या सुमारास जेवण झाल्यानंतर त्यांपैकी काही जण समुद्रात उतरले. ती वेळ ओहोटीची होती. त्यामुळे अनेक विद्यार्थी आतपर्यंत गेल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. मात्र पाण्याच्या अंतर्गत प्रवाहांचा आणि खोलीचा अंदाज न आल्याने त्यातील १८ जण पाण्यात ओढले गेले. ते बुडत असल्याचे पाहून व त्यांची जीव वाचविण्यासाठी सुरू असलेली धडपड पाहून किनाऱ्यावरील विद्यार्थ्यांनी मदतीसाठी आक्रोश करण्यास सुरूवात केली. हे दृष्य पाहून स्थानिकांनी आणि किनाऱ्यावरील जीवरक्षकांनी ताबडतोब मदतीसाठी धाव घेतली. बचावकार्यात मच्छीमार आणि तटरक्षक दलाचीही मदत
घेण्यात आली. बुडणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी पाच जणांना वाचवण्यात यश आले. मात्र १३ जण बुडून मरण पावले. त्यात १० मुले आणि ३ मुलींचा समावेश आहे. जखमींवर मुरुड येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तटरक्षक दलाच्या नौका, चेतक व सी-किंग हेलिकॉप्टर बुडालेल्या विद्यार्थ्यांचा शोध घेत आहेत. नौदलानेदेखील आपल्या दोन नौका शोधकार्यासाठी रवाना केल्या आहेत.
मदतकार्यात सहभागी होण्यासाठी संस्थेचे पदाधिकारी घटनास्थळी रवाना झाले असून पुण्यातून दहा रुग्णवाहिकाही पाठवण्यात आल्या आहेत. मृत पावलेल्या विद्यार्थ्यांची नावे समजली असून खातरजमा झाल्यानंतरच त्यांची नावे पालकांना कळविण्यात येतील, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष पी. ए. इनामदार यांनी दिली. घटनास्थळी जीवरक्षक तैनात नसल्याचा आरोपही त्यांनी केला.

सायंकाळी चारच्या सुमारास मुरुड येथे सहलीसाठी आलेले १५ ते १८ विद्यार्थी समुद्रात ओढले गेल्याची बातमी तटरक्षक दलाला मिळाली. त्यांच्या सुटकेसाठी आयसी ११७ विमान आणि दोन बोटी तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच, सायंकाळी सहा वाजता हेलिकॉप्टरसह ‘अचूक’ ही गस्तीनौका शोधकार्यात सहभागी करून घेण्यात आली.
– प्रवक्ता, तटरक्षक दल

यापूर्वीच्या दुर्घटना
*२६ सप्टेंबर १५ – मुंबईतील चेंबूरहून चिपळूण, गोवळकोट येथे गेलेल्या शेख कुटुंबीयांपैकी ७ जणांचा गुहागर समुद्रकिनाऱ्यावर मृत्यू.
*२७ सप्टेंबर – बेळगावमधील दोन बहिणींचा देवबाग समुद्रकिनारी मृत्यू.
*१३ सप्टेंबर – रत्नागिरी जिल्ह्य़ातील तीन घटनांमध्ये ६ बळी.
*६ जुलै १४ – अलिबागला मुंबईतील ६ पर्यटकांचा मृत्यू.