भरधाव टेम्पोने शाळेतून परतणाऱ्या चार मुलींना धडक दिल्याची घटना मालाडमध्ये घडली. या अपघातात १३ वर्षांच्या मुस्कान मेमन या मुलीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. टेम्पोचालक अपघातानंतर पसार झाला असून त्याचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मालवणी परिसरात राहणारी मुस्कान आणि तिच्या मैत्रिणी मुली महापालिकेच्या शाळेत शिकतात. मंगळवारी सकाळी मुस्कान, तिची मैत्रिणी नेहा आणि अन्य दोन मुली शाळेत जाण्यासाठी निघाल्या. यावेळी मार्वे रोडवरील जरीमरी मंदिराजवळून जात असताना भरधाव टेम्पोने चौघांना उडवले. चालकाचे टेम्पोवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगितले जाते. विद्यार्थ्यांना उडवल्यानंतर टेम्पोने रस्त्यालगत थांबलेल्या रिक्षेला धडक दिली. यात रिक्षाचालकही किरकोळ जखमी झाला आहे. या अपघातात मुस्कान मेननचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर उर्वरित दोन मुलींची प्रकृती गंभीर आहे. तर तिसऱ्या मुलीची प्रकृती स्थिर असली तरी तिला मानसिक धक्का बसल्याचे समजते. याप्रकरणी पोलिसांनी टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. टेम्पोचालक फरार असून पोलीस उपायुक्तांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.