गेल्या २२ दिवसांमध्ये मुंबईमध्ये डासांची तब्बल १३०० उत्पत्तीस्थाने सापडली असून सोसायटय़ा, चाळी आणि झोपडपट्टय़ांमध्ये वारंवार जनजागृती करूनही त्याचे गांभीर्य रहिवाशांना समजलेले नाही. परिणामी घरातील शोभेची झाडे आणि पाण्याच्या पिंपांमध्ये डासांच्या अळ्या सापडत आहेत. सूचना करूनही डेंग्यु रुग्णांच्या घरांमधील डासांची उत्पत्तीस्थाने ‘जैसे थे’ असल्याचे आढळून येत आहे. घरातील डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट करण्यासाठी रहिवाशीच प्रयत्न करीत नसल्याने पालिका हतबल झाली आहे. परिणामी डेंग्युचा धोका अधिकाधिक वाढू लागला आहे.
मुंबईमध्ये डेंग्युच्या साथीचा प्रादुर्भाव वाढू लागल्यामुळे पालिकेने ठिकठिकाणी मोठय़ा प्रमाणावर धूम्रफवारणी, कीटकनाशक फवारणी सुरू केली आहे. तसेच घरोघरी फिरून, तसेच पत्रके वितरित करून डेंग्युविरोधात जनजागृती सुरू केली आहे.
सोसायटय़ा, चाळी, झोपडपट्टय़ांमध्ये फिरून डासांची उत्पत्तीस्थाने शोधून ती नष्ट करण्यासाठी पावले उचलण्यात येत आहेत. तसेच घरामध्ये डासाच्या अळ्या होऊ नयेत यासाठी कोणती काळजी घ्यावी याची माहिती दिली जात आहे. परंतु इतके करूनही रहिवाशी काळजी घेत नसल्याचे आढळून आले आहे, अशी माहिती कीटकनाशक विभागाचे अधिकारी राजन नारिंग्रेकर यांनी दिली.
मुंबईमध्ये १ ते २२ नोव्हेंबर या काळात सोसायटय़ा, चाळी आणि झोपडपट्टय़ांमधील घराघरात जाऊन पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पाहणी केली. या पाहणीत उच्चभ्रू सोसायटय़ांमधील घरांमध्ये शोभेची झाडे, तर चाळी आणि झोपडपट्टय़ांमध्ये पाण्याच्या पिंपे, नारळ ठेवलेल्या कलशात डासांच्या अळ्या आढळून आल्या. गेल्या २२ दिवसांमध्ये सोसायटय़ा, चाळी आणि झोपडपट्टय़ांमध्ये डासांच्या उत्पत्तीची १३०० ठिकाणे आढळून आली आहेत. ही उत्पत्तीस्थाने नष्ट करणे, पुन्हा अळ्या होऊ नयेत, यासाठी रहिवाशी कोणतेही प्रयत्न करीत नसल्याचे आढळून आले आहे, असे राजन नारिंग्रेकर यांनी सांगितले.