संदीप आचार्य

मुंबई महापालिकेतील जाहीर न केलेल्या ४५१ मृत्यू प्रकणाने प्रचंड खळबळ उडाल्यानंतर महापालिकेने युद्धपातळीवर पालिकेतील सर्व शिल्लक मृत्यूंचे विश्लेषण करण्याचे काम सोमवारी पूर्ण केले असून त्यांनी केलेल्या अहवालानुसार मुंबई महापालिकेच्या लपलेले ८६२ करोना मत्यू आता उघड झाले आहेत तर राज्यात अन्यत्र ४६६ करोना मृत्यू उघडकीस आल्याने एप्रिलपासून नोंदविण्यात न आलेले
१३२८ करोना मृत्यू आज सरकारला जाहीर करावे लागले आहेत.

‘लोकसत्ता’ने याबाबतचे वृत्त प्रथम दिले होते. त्यात ४५१ मृत्यू करोना मृत्यू असल्याचे तसेच सुमारे ५०० मृत्यूंचे विश्लेषण करणे बाकी असल्याचे अघडकीस आणले होते. या एकूण १३२८ मृत्यू उघडकीस आल्यामुळे राज्याचा मृत्यूदर ३.७ टक्क्यांवरून वाढून ५ टक्क्यांपर्यंत जाणार आहे. यात ठाण्यात तब्बल १४६ मृत्यू जाहीर केले नसल्याचे उघडकीस आले आहे.

मुंबई महापालिकेने एप्रिल मधील जवळपास ४५१ करोना मृत्यू हे ‘करोना मृत्यू’ नसल्याची भूमिका घेतल्याने पालिका संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे. ८ जून रोजी महापालिकेने आरोग्य विभागाला पाठवलेल्या यादी व मेल मध्ये हे ४५१ मृत्यू करोना चे असल्याचे नमूद केले होते. त्यानंतर १२ जून रोजी पाठवलेल्या दुसऱ्या मेल मध्ये हे करोना मृत्यू म्हणून गृहित धरू नये अशी भूमिका पालिकेने घेतल्याचे आता स्पष्ट होत आहे. याबाबत पालिका आयुक्त व अतिरिक्त आयुक्तांकडे लोकसत्ताने विचारणा करूनही कोणतेही ठोस उत्तर मिळाले नाही.

दरम्यान मुख्य सचिव अजोय मेहता यांनी या प्रकरणाची दखल घेत मुंबई महापालिकेतील एकूणच करोना मृत्यूंची माहिती दोन दिवसात जाहीर केली जाईल, असे स्पष्ट केले. तसेच यात कोणी दोषी आढळल्यास कारवाई केली जाईल, असेही सांगितले. या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून पालिकेने शिल्लक असलेल्या मृत्यूंचे विश्लेषण करण्यासाठी पाठपुरावा सुरु केला.

यासाठी ‘डेथ ऑडिट कमिटी’ पुढे सर्व कागदपत्रे येणे आवश्यक होते. काही मृत्यूप्रकरणांची कागदपत्रे अपलोड होण्यास वेळ लागत असल्याने पालिकेने शेवटी पेन ड्राईव्ह वर सर्व कागदपत्रे घेऊन सोमवारी सर्व शिल्लक मृत्यूंच्या विश्लेषणाचे काम पूर्ण केले गेले. यासाठी समितीत जवळपास वीस तज्ज्ञांनी काम केल्याचे समितीतील एका ज्येष्ठ डॉक्टरांनी सांगितले. सुमारे ५०० हून अधिक शिल्लक प्रकरणांचे विश्लेषण करण्यात आले असून आज महापालिकेने त्यांच्याकडील शिल्लक ८६२ मृत्यू जाहीर केले. राज्यात अन्यत्र ४६६ करोना मृत्यू उघडकीस आले असून यात अकोला १२,जळगाव ३४, धुळे १८, पुणे ८५, रायगड १४, सोलापूर ५१ आणि ठाण्यात १४६ लपलेले करोना मृत्यू उघडकीस आले आहेत.

राज्यातील आणखीही काही पालिकांमधील करोना मृत्यूंची संपूर्ण आकडेवारी जाहीर झाली नसावी असे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी सांगितले होते. तसेच राज्यातील एकही करोना मृत्यू आम्ही लपवणार नाही, असेही मुख्य सचिव म्हणाले. राज्यातील सर्वच्या सर्व करोना मृत्यू जाहीर केले जातील,असेही त्यांनी सांगितले. त्यानुसार आरोग्य विभागाने हे लपलेले करोना मृत्यूचे आकडे जाहीर केले. मुख्य सचिव अजोय मेहता याबाबत म्हणाले की, आयसीएमआर व अन्य मार्गदर्शक तत्वानुसार हे मृत्यू जाहीर करण्यात आले आहेत.