टाटा मुंबई मॅरेथॉनच्या उत्साहाला धावपटूच्या मृत्यूचे गालबोट लागले. ज्येष्ठ नागरिकांच्या गटात धावणाऱ्या गजेंद्र मांजळकर (वय ६४) यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. याशिवाय साडेतेराशे धावपटू जखमी झाले, तर १७ जणांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली.

मांजळकर ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते. गरवारे चौकाजवळ त्यांना हृदयविकाराचा झटका आला. रुग्णवाहिकेतून वैद्यकीय मदत केंद्रावर आणून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

मॅरेथॉनदरम्यान छातीत धडधड होणे, छातीत दुखणे, अस्थिभंग (फ्रॅक्चर), जबडय़ाला दुखापत, स्नायू आखडणे यांमुळे एकूण १७ धावपटूंना बॉम्बे, लीलावती, जीटी, हिंदुजा या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले. त्यापैकी १४ जणांना उपचारांनतर घरी सोडण्यात आले.

वैद्यकीय मदत केंद्रात उपचार

अर्ध मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या ५१ वर्षीय धावपटूला मेंदुघाताचा (ब्रेन स्ट्रोक) त्रास झाला, तर ४१ वर्षीय धावपटूला हृदयविकाराचा झटका आला. या दोघांवर बॉम्बे हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या स्पर्धेदरम्यान १९ धावपटूंना शरीरातील पाणी कमी झाल्यामुळे त्रास झाला. त्यांच्यावरही वैद्यकीय मदत केंद्रात उपचार करण्यात आले. याशिवाय १३५० धावपटू किरकोळ जखमी झाले, अशी माहिती टाटा मॅराथॉनचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय डिसिल्वा यांनी दिली.