वर्षभरात १३ हजार ५६५ चोरीच्या घटना; अवघ्या २ हजार प्रकरणांचा छडा लावण्यात यश

फलाटांमधील पोकळी, पादचारी पुलांवर होणारी चेंगराचेंगरी, रुळांवर होणारे अपघात अशा विविध घटनांनी मुंबई उपनगरीय रेल्वेचा प्रवास असुरक्षित बनला असतानाच लोकल आणि रेल्वे स्थानकांत होणाऱ्या चोऱ्यांची यात भर पडली आहे. लोहमार्ग पोलिसांच्या आकडेवारीनुसार, यंदाच्या वर्षी, २०१७ मध्ये विविध प्रकारच्या चोरीच्या तब्बल १३ हजार ५६५ गुन्ह्य़ांची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे, यातील अवघ्या दोन हजार २९ गुन्ह्य़ांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे.

मुंबई उपनगरीय रेल्वे मार्ग मध्य रेल्वे मुख्य मार्ग, हार्बर आणि पश्चिम रेल्वे असा विभागला गेला आहे. मुख्य व हार्बर मार्ग सीएसएमटी ते कसारा, कर्जत, खोपोली, पनवेल व अंधेरीपर्यंत, तर पश्चिम रेल्वे चर्चगेट ते डहाणूपर्यंत आहे. उपनगरीय रेल्वेत गुन्ह्य़ांना आळा घालण्याची जबाबदारी लोहमार्ग पोलिसांकडे असून रेल्वे सुरक्षा दलाकडे रेल्वेच्या मालमत्तेची सुरक्षा करणे व लोहमार्ग पोलिसांना गुन्हे तपासकामात मदत करण्याची जबाबदारी आहे. रेल्वे प्रवाशांची सुरक्षा नेहमीच कळीचा मुद्दा राहिला असून कमी मनुष्यबळामुळे प्रवाशांची सुरक्षा करताना लोहमार्ग पोलीस व रेल्वे सुरक्षा दलाची नेहमीच दमछाक होते. तरीही प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सज्ज असल्याचा दावा या दोन्ही पोलीस विभागांकडून केला जातो. मात्र यंदाच्या वर्षीच्या चोरीच्या घटनांच्या संख्येने हा दावा खोटा ठरवला आहे.

मोबाइल चोरी, पाकीटमारी, सोन्याच्या चैन आणि मंगळसूत्र चोरीबरोबरच प्रवाशांच्या लोकल डब्यातील बॅग लंपास करण्याचे गुन्हे लोकल प्रवासात घडतात. त्याबद्दल प्रवाशांकडून तक्रारी दाखल केल्या जातात; परंतु तक्रार दाखल झाल्यानंतर गुन्ह्य़ांचा यशस्वी तपास करून प्रवाशांना त्यांच्या वस्तू परत मिळवून देण्याचे प्रकार क्वचितच होतात.

२०१६ मध्ये तीन हजार ३१५ चोरीचे विविध गुन्हे घडले. यापैकी १८०० गुन्ह्य़ांचा पोलिसांनी यशस्वीपणे छडा लावला. यंदाच्या वर्षीच्या आकडेवारीवर नजर टाकता, गतवर्षीची पोलिसांची कामगिरी सरस असल्याचे दिसून येते. यंदाच्या वर्षी मुंबई उपनगरीय रेल्वेमार्गावर १३ हजार ५६५ चोरीच्या घटना घडल्या. मात्र, त्यापैकी अवघ्या दोन हजार २९ गुन्ह्य़ांचा यशस्वी तपास पूर्ण झाला. सर्वाधिक चोरीच्या घटना ठाणे आणि कुर्ला लोहमार्ग पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घडल्याचे आकडेवारीतून उघड होते.

मोबाइल चोर सोकावले

यंदाच्या वर्षी घडलेल्या चोरीच्या एकूण घटनांपैकी ७० टक्के घटनांत प्रवाशाचा मोबाइल चोरटय़ांनी लंपास केल्याचे उघड होत आहे. गेल्या वर्षीही घडलेल्या एकूण ३ हजार ३१५ चोऱ्यांपैकी दोन हजार प्रकरणे मोबाइल चोरीची होती. त्यापैकी १२०० प्रकरणांत चोरांना ताब्यात घेऊन मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले.