मुंबईत बुधवारी १,३९० नवीन रुग्णांची नोंद झाली असून, एकूण बाधितांची संख्या ९६ हजारांच्या पुढे गेली आहे. तर दिवसभरात ६२ रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या ५,४६४ वर गेली आहे. मुंबईच्या मृत्यूदरात काहीशी घट होऊन तो ५.८ वरून ५.६ इतका झाला आहे.

मुंबईत बुधवारी आणखी ९९६ संशयित रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याचबरोबर एका दिवसात १,१९७ रुग्णांना घरी पाठवण्यात आले आहे. आतापर्यंत ६७,८३० म्हणजेच ७० टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. सध्या २२,९५९ उपचाराधीन रुग्ण असून १०३७ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे.

बोरिवलीत २४ तासांत १११ बाधित

बुधवारी बोरिवलीत (‘आर’ मध्य विभाग) १११ आढळून आले. या भागातील रुग्णवाढीचा वेग (२.६ टक्के) हा मुंबईतील सर्वात जास्त आहे. रुग्णदुपटीचा कालावधी मुंबईतील अन्य भागांपेक्षा सर्वात कमी म्हणजे २७ दिवस इतका आहे. बोरिवलीतील एकूण बाधितांची संख्या ४,००० असून १,५३३ उपचाराधीन रुग्ण या भागात आहेत.