अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी तपास करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्याला क्वारंटाइन करण्यावरून बिहार पोलिसांनी महापालिकेवर आरोप केले होते. या प्रकरणानंतर महापालिकेनं कडक भूमिका घेतली आहे. महापालिकेनं करोनाच्या पार्श्वभूमीवर १४ दिवस क्वारंटाइन राहण्याचा नियम सक्तीचा केला आहे. याप्रकरणी मुंबई महापालिकेनं आदेश काढले आहेत.

सुशांत सिंह प्रकरणाचा तपास करण्यासाठी आलेल्या पोलीस अधीक्षक विनय तिवारी यांना महापालिका प्रशासनानं क्वारंटाइनमध्ये राहण्यास सांगितलं होतं. त्यावरून बृह्नमुंबई महापालिकेवर टीका करण्यात आली होती. या प्रकरणानंतर महापालिकेनं कठोर भूमिका घेतली आहे. महापालिकेनं क्वारंटाइनच्या नियमासंदर्भात नवीन आदेश काढले आहेत.

राज्य सरकारनं करोनाच्या पार्श्वभूमीवर काढलेल्या आदेशातील क्वारंटाइनच्या नियमाचा हवाला देत महापालिकेनं मुंबईत येणाऱ्या प्रत्येक नागरिकांनं १४ दिवस होम क्वारंटाइन राहणं अनिवार्य असल्याचं म्हटलं आहे. अशा काही घटना समोर आल्या आहेत की, मुंबईत दाखल झाल्यानंतर काही शासकीय अधिकारी ओळखपत्र दाखवून क्वारंटाइनमधून सुटका मिळवत आहेत. पण, यापुढे ज्या शासकीय अधिकाऱ्यांना मुंबईत आल्यानंतर कामासाठी बाहेर पडायचं असेल, तर त्यांनी परवानगी घ्यावी. दोन दिवस अगोदर तशी विनंती महापालिकेकडे करावी, असं महापालिकेनं आपल्या आदेशात म्हटलं आहे.

राज्यात सुरूवातीच्या काळात मुंबईत करोनाचा प्रसार झपाट्यानं झाला. महापालिकेनं प्रसार नियंत्रणात आणण्यासाठी चेस द व्हायरस मोहीम हाती घेतली होती. मुंबईत मोठ्या संख्येनं करोनाबाधित रुग्ण आढळून येत होते. विशेषतः धारावी सारख्या भागात करोनानं मोठं संकट उभं केलं होतं. मात्र, उपाययोजनांमुळे मुंबईतील करोना परिस्थिती आता हळूहळू नियंत्रणात येत असल्याचं चित्र आहे.