माथेरानची ओळख केवळ एक पर्यटनस्थळ अशीच होती, पण आता तेथे १२५ वर्षांनंतर फुलपाखरांच्या १४० प्रजातींची नोंद करण्यात आली आहे. यापूर्वी १८९४ मध्ये ७८ फुलपाखरांच्या प्रजातींची नोंद होती. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएचएस) आणि सोमैया विद्याविहार विद्यापीठातील संशोधकांनी माथेरानच्या फुलपाखरांवर केलेला अभ्यास ‘बायोडायव्हर्सिटी डाटा जर्नल’मध्ये प्रकाशित करण्यात आला आहे.

मुंबईपासून हाकेच्या जवळच असलेल्या माथेरानमध्ये जे. ए. बेथम यांनी एप्रिल आणि मे १८९४ मध्ये माथेरानच्या पहाडांमध्ये सर्वेक्षण केले. त्या वेळी त्यांनी ७८ फुलपाखरांच्या प्रजातींची नोंद केली होती. मुंबईतील संशोधकांनी भविष्यात या ठिकाणी संशोधन करावे आणि फुलपाखरांच्या आणखी काही प्रजाती शोधून काढाव्यात, अशी अपेक्षा त्यांनी त्या वेळी व्यक्त केली होती. आता १२५ वर्षांनी बीएनएचएस आणि सोमैया विद्याविहार विद्यापीठाच्या संशोधकांनी माथेरानच्या फुलपाखरांचा अभ्यास केला आहे. शोधलेल्या फुलपाखरांच्या काही प्रजातींचा समावेश वन्यजीव कायद्यानुसार प्रथम आणि द्वितीय श्रेणीत होत असल्याचे आढळले. ‘डबल बॅण्डेड क्रो’ हे फुलपाखरू या संशोधक चमूला प्रथमच आढळले.

बीएनएचएस आणि सोमैया विद्याविहार विद्यापीठाच्या संशोधकांनी २०११ ते २०१९ या आठ वर्षांत सुमारे १४० फुलपाखरांच्या प्रजाती आणि २२ हजारांहून अधिक फुलपाखरांची निरीक्षणे नोंदवली. ‘विसरलेल्या रत्नांचा शोध : १२५ वर्षांनंतर माथेरानच्या फुलपाखरांना भेट आणि भारतीय फुलपाखरांची कृतिशीलता व हंगामी वर्णनाकरिता नवी रंग बारकोड पद्धतीची ओळख’ असे त्यांच्या संशोधन पत्रिकेचे शीर्षक आहे.

यादीचे महत्त्व

माथेरान हे पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध आहेच, पण त्याचबरोबर ते पर्यावरणदृष्टय़ा संवेदनशील म्हणूनही ओळखले जाते. त्यामुळे येथील जैववैविध्य जपणे हे एक आव्हान आहे. त्यासाठी जैवविविधतेची विस्तृत माहिती आवश्यक आहे. पर्यटकांची वाढती गर्दी, त्यामुळे होणारा कचरा आणि विकासकामे यामुळे प्रत्येक छोटय़ामोठय़ा घटकावर होणाऱ्या परिणामांचा विचार करताना अशी यादी महत्त्वाची ठरते.

* मंदार सावंत, डॉ. निखिल मोडक, सागर सारंग यांनी माथेरानच्या जंगलात आठ वर्षे संशोधन केले. त्यासाठी रंग बारकोडचा वापर केला.

* रंग बारकोड पद्धतीमुळे सामान्य निरीक्षकांनाही फुलपाखराचे वैविध्य समजणे सोपे जाते, सादरीकरणातही त्याचा चांगला वापर.

* रंग बारकोडमुळे फुलपाखरांच्या क्रियाकल्पांची माहिती पोहोचवण्यास उपयोगी.

* फुलपाखरांच्या दीर्घकालीन अभ्यासामुळे पर्यावरणाचे तंत्रज्ञान समजून घेण्यास, त्याच्या संरक्षणास मदत.

* ‘बीएनएचएस’चे सहलेखक डॉ. निखिल मोडक यांचे जैववैज्ञानिक तंत्र वापरण्यात मोलाचे योगदान.

माथेरानच्या जंगलातील फुलपाखरांना कॅमेऱ्यात कैद करताना आम्हालाही भविष्यात आपण यावर शोधनिबंध तयार करू किंवा आपल्या या अभ्यासाचे रूपांतर शोधनिबंधात होईल, असे वाटले नव्हते.

– मंदार सावंत, बीएनएचएस