दहिसरमध्ये खारफुटीच्या जंगलात वसलेल्या गणपत पाटील नगरातील झोपडय़ांवर पालिकेने गुरुवारी हातोडा चालवित सुमारे १४०० अनधिकृत झोपडय़ा जमीनदोस्त केल्या.
या भागात मोठय़ा प्रमाणावर अनधिकृत झोपडय़ा उभारल्या असून त्याविरोधात कारवाई झाली नाही तर पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांच्या दालनाबाहेर उपोषणास बसू, असा इशारा शिवसेनेचे नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांनी ७ जानेवारीला दिला होता. त्यामुळे प्रशासनाने तातडीने बैठक घेऊन कारवाई करण्याचा निर्णय घेतला.
किनाऱ्यापासून ५० मीटरच्या आत कोणतेही बांधकाम करू नये या सरकारच्या नियमाचा आधार घेऊन वन अधिकाऱ्यांनी गणपत पाटील नगरात आखणी करून दिली होती. मात्र त्याला काँग्रेसच्या नगरसेविका शीतल म्हात्रे व माजी नगरसेवक राजेंद्र चौबे यांनी आक्षेप घेतला. यावरुन पोलीस ठाण्यात बराच काळ गोंधळ झाला. परिणामी सकाळी ९ वाजता सुरू होणारी कारवाई दुपारी १२.३० वाजता सुरू झाली. कारवाईसाठी कर्मचारी रवाना होताच गणपत पाटील नगरातील प्रत्येक गल्ल्यांच्या तोंडावर १०० ते १५० नागरिकांनी गर्दी केली. परिणामी प्रचंड गोंधळ निर्माण झाला.अतिरिक्त पोलीस आयुक्त पारसकर यांच्या नेतृत्वाखाली २०० पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कडेकोट बंदोबस्तामध्ये कारवाई सुरू झाली. पालिकेच्या १५० कर्मचाऱ्यांनी ९ जेसीबी, १८ डंपरच्या मदतीने १४१० झोपडय़ा जमिनदोस्त केल्या. पालिकेचे उपायुक्त (परिमंडळ-७) बी. आर. मराठे, अतिक्रमण विभागाचे उपायुक्त आनंद वागराळकर, आर-उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त संतोषकुमार धोंडे, वन अधिकारी राठोड यांच्या उपस्थितीत ही कारवाई झाली.
कारवाईच्या धावपळीत यशोदा सुभाष यादव (३५) या महिलेस हृदय विकाराचा तीव्र झटका आला. त्यांना तातडीने भगवती रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र वाटेतच त्यांचे निधन झाले. यशोदा यादव यांचे घर तिवरांच्या झाडांपासून ५० मीटर अंतराबाहेर होते. त्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यात येणार नव्हती.