आरटीओकडून स्टिकरचा पुरवठा; मदतीसाठी २४ तास नियंत्रण कक्ष

 

मुंबई : करोनामुळे उद्भवलेल्या आपात्कालिन परिस्थितीत जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत राहण्यासाठी अत्यावश्यक सेवेतील वाहनांना स्टिकर्स बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करताना पोलिसांकडून कोणतीही अडचण येणार नाही. या स्टिकर्सचा पुरवठा त्या-त्या विभागातील आरटीओकडून केला जाईल. वाहतुकदारांच्या मदतीसाठी २४ तास नियंत्रण कक्षही स्थापन करण्यात आले आहे.

परिवहन मंत्री अनिल परब, परिवहन आयुक्त शेखर चन्न्ो आणि मालवाहतूक ट्रक, टेम्पो संघटना यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीत मालवाहतूक वाहनांना स्टिकर्स बसवण्याचा निर्णय घेतला. हे स्टिकर्स वाहनांच्या दर्शनी भागावर चिकटवण्यात येतील. वाहतूकदाराने संबंधित आरटीओ कार्यालयाशी संपर्क साधून वाहनातून अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक करणार असल्याबाबतचा पुरावा सादर करणे आवश्यक आहे. त्यानंतर प्रत्येक वाहनासाठी एक स्टिकर देण्यात येणार असल्याचे परिवहन आयुक्त कार्यालयाने सांगितले.

अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक करणारे वाहन चालक, माल भरणारे आणि उतरविणारे कामगार यांना त्यांच्या घरापासून वाहनापर्यंत तसे वाहतुकीचे काम पूर्ण झाल्यानंतर घरापर्यंत जाण्यासाठी जर एखाद्या जीप, कार अशा वाहनाचा वापर वाहतुकदार करत असतील तर ही वाहतूकदेखिल अत्यावश्यक सेवा समजण्यात येणार आहे.

फोर्ट येथील कार्यालयात नियंत्रण कक्ष

मालवाहतुकदारांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासंदर्भात आवश्यक सहकार्य करण्याच्या सूचना परिवहन आणि पोलिस विभागाला देण्यात आल्याचेही बैठकीत सांगण्यात आले. वस्तूंचा पुरवठा करताना वाहतूकदाराला कोणतीही अडचण आल्यास तो नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून अडचण मांडू शकतो. यासाठी मुंबईतील फोर्ट येथील परिवहन आयुक्त कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन केल्याचे परिवहन आयुक्त शेखर चन्न्ो  यांनी सांगितले.

नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक ०२२-२२६१४७२४ असून तो २४ तास कार्यरत असणार आहे.