दादर येथील उपनगरी प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी बांधण्यात येत असलेल्या परळ टर्मिनसवरून १५ डब्यांची जलद गाडीही धावू शकणार आहे. या टर्मिनसचा आर्थिक प्रस्ताव पुढील आठवडय़ात रेल्वे बोर्डाकडे सादर होणार आहे.
परळ येथे मध्य आणि पश्चिम रेल्वेला जोडणारा मार्ग असून चर्चगेट येथून ठाण्याकडे तर छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून बोरिवलीकडे जाणारा छेद मार्गही उपलब्ध आहे. सध्याच्या फलाट क्रमांक १ च्या बाजूला एक ‘होम प्लॅटफॉर्म’ बांधण्यात येणार आहे. १५ डब्यांची गाडी उभी राहू शकेल इतकी लांबी या फलाटाची असेल, असे सूत्रांनी सांगितले. येथून सुटणारी गाडी दादरच्या आधी जलद मार्गावर जाऊ शकेल.
या फलाटावर जाण्यासाठी तीन पादचारी पूल असतीलच; पण त्याच्या दक्षिणेकडे थेट एल्फिन्स्टन रोड पुलावर जाण्याचा मार्ग असेल. त्यासाठी या पुलाच्या बाजूला साधारण सात मीटर लांबीचा विस्तारित पूल उभारण्यात येईल. त्यामुळे प्रवासी तेथे टॅक्सीतून उतरू शकेल किंवा स्थानकातून येणाऱ्या प्रवाशाला टॅक्सी पकडणे शक्य होईल. नव्या फलाटावर उभ्या राहणाऱ्या गाडीला दोन्ही बाजूला उतरण्याची सोय असेल. त्यासाठी सध्या असलेल्या फलाट क्रमांक एकचा विस्तार करण्यात येणार आहे.
नव्याने बांधण्यात येणाऱ्या फलाटाकडे छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून येणाऱ्या गाडय़ा उभ्या राहणार असून कुर्ला ते परळ दरम्यानच्या पाचव्या-सहाव्या मार्गाचेही काम सुरू होत असल्याचे सूत्रांनी सांगितले.