गेल्या आठवडाभरापासूनच जेएनपीटी ते पामबीच मार्ग तसेच जेएनपीटी ते पळस्पे दरम्यानच्या वाहतूक कोंडीमुळे या मार्गावरील प्रवासी त्रस्त आहेत. त्यातच शनिवारी सायंकाळी ६ ते १० या वेळेत झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीमुळे जेएनपीटी ते कंळबोली तसेच जेएनपीटी ते गव्हाण फाटा दरम्यान पंधरा किलोमीटपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
जेएनपीटी ते पळस्पे फाटा हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ब तसेच जेएनपीटी ते पामबीच मार्ग क्रमांक ५४ राज्य महामार्ग अशा दोन्ही मार्गावरील वाहतूक या कोंडीमुळे ठप्प झाली होती़ जेएनपीटी बंदर व बंदरावर आधारित उद्योगामुळे या परिसरातून दररोज हजारो अवजड वाहने तसेच हलकी वाहने रहदारी करीत आहेत. या वाहनांना बंदरात संथगतीने प्रवेश मिळत असल्याने करळ ते पागोटे पूलादरम्यान दररोज अवजड वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात परिणामी या मार्गावरून उरण-पनवेल मार्गावरील प्रवासी वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत आहे. त्याच प्रमाणे उरण -पनवेल व जेएनपीटी ते पळस्पे फाटा दरम्यानच्या रस्ताच्या कडेला बेकायदेशीर कंटेनर गोदाम उभारण्यात आल्याने या रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या गोदामात ये-जा करण्यासाठी कंटेनरची संख्या अधिक असल्याने इतर वाहनांना तासंतास कोंडीला सामोरे जावे लागत आहे. तसेच गव्हाण फाटा येथून राष्ट्रीय महामार्गावर शार्टकट जाण्यासाठी चिरनेर फाटय़ाचा वापर होत असल्याने गव्हाण फाटय़ावरही वाहतूक कोंडी होऊन अनेक वाहने अडकून पडत आहेत.