News Flash

चिंता वाढली; धारावीत आढळले आणखी १५ करोना बाधित, एकूण संख्या ४३ वर

धारावीसह दादरमधीलही रूग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे.

संग्रहित प्रतिकात्मक छायाचित्र.

आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत करोनाचा फैलाव वाढू लागल्यामुळे मुंबईकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. धारावीतील करोना रुग्णांचा आकडा दररोज वाढतोच आहे. रविवारी या झोपडपट्टीतील करोना रुग्णांची संख्या १५ ने वाढली आहे. आतापर्यंत या झोपडपट्टीत एकूण ४३ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले असून, ४ जणांचा मृत्यू झाला आहे. धारावीसह दादरमधीलही रूग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. आज, दादरमध्ये दोन नवे रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे दादरमधील करोना रुग्णांची संख्या तेरा वर पोहोचली आहे. धारावी आणि दादरमधील करोनाच्या रूग्णांची संख्या दिवसागणिक वाढतच असल्यामुळे आरोग्य यंत्रणेसमोरचं टेन्शन वाढलं तर मुंबईकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

धारावीतील नव्या १५ करोना रूग्णांपैकी नऊ रूग्णांवर राजीव गांधी क्वॉरंटाइन केंद्रात उपचार सुरू आहेत. हे नऊ रुग्ण धारावीतील सोशल नगरमध्ये मृत्यू पावलेल्या मृत व्यक्तीच्या आणि मदिना नगरमधील करोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आले होते. इतर सहा नव्या करोना रुग्णांपैकी चारजण हे सोशल नगरजवळच्या शास्त्रीनगर येथील आहेत. तर दोनजण जनता हौसिंग सोसायटीमधील आहेत.

धारावीसारख्या दाटीवाटीच्या वस्तीत करोनाचा प्रसार चिंताजनक आहे. हा प्रसार वाढत गेल्यास त्यावर नियंत्रण मिळवणे कठीण होईल, याची जाणीव असल्याने पालिकेने केवळ धारावीतील करोना नियंत्रणासाठी कृती आराखडा तयार केला आहे. त्या आराखडय़ात धारावीतील २१ प्रतिबंधित आणि पाच धोकादायक भाग निश्चित करण्यात आले आहेत. धारावीमधील कल्याणवाडी, मुकुंद नगर, सोशल नगर, मुस्लीम नगर, मदिना नगर या पाच भागांमध्ये करोनाबाधित सापडले असून ही पथके या परिसरातील घराघरांत पोहोचून नागरिकांची ताप, कफ आदींबाबत तपासणी करणार आहेत. करोनाची लक्षणे जाणवणाऱ्या व्यक्तीला तात्काळ विलगीकरण केंद्रात वा रुग्णालयात पाठविण्यात येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2020 11:30 am

Web Title: 15 new coronavirus positive cases have been reported in dharavi nck 90
टॅग : Coronavirus
Next Stories
1 मुंबईतील ताज हॉटेलला करोनाचा विळखा; सहा जण पॉझिटिव्ह
2 नोकरीची संधी : मुंबई महापालिकेत ११४ वॉर्ड बॉयची भरती
3 मुंबईतील १७ वाहनतळांवर चाचण्यांसाठी नमुने संकलन
Just Now!
X