रेल्वे प्रवाशांसाठी रविवार घातवार
रेल्वे अपघाताचा रविवार घातवार ठरला आहे. एकाच दिवशी रेल्वे अपघात १५ जणांना मृत्यू झाला आहे. यात १३ पुरुष दोन महिलांचा समावेश आहे. तर जखमी प्रवाशांत १२ पुरुष, तर दोन महिलांचा समावेश असल्याचे लोहमार्ग पोलिसांच्या आकडेवारी नमूद करण्यात आले आहे.
रेल्वे अपघातांतील मृतांचा आकडा खाली आला, मात्र रविवारच्या दिवशी पुन्हा एकदा रेल्वेमार्गावर मृत्यूचे तांडव पाहायला मिळाले. लोहमार्ग पोलिसांच्या नोंदीप्रमाणे मुंबई उपनगरीय क्षेत्रात या एकाच दिवशी १५ जणांचे मृत्यू झाले. यात सर्वाधिक मृत्यू कल्याण, वडाळा रोड, कुर्ला आणि छत्रपती शिवाजी टर्मिनस या स्थानकांदरम्यान झाले आहेत. भावेश नकातेच्या अपघाती मृत्यूनंतर रेल्वे मंत्रालयानेच रेल्वेमार्गावरील अपघात रोखण्यासाठी समितीची स्थापना केली होती. या समितीने त्यासाठी विविध उपाययोजनाही सुचवल्या होत्या. त्याशिवाय रेल्वे सुरक्षा दलाने अपघातासाठी संवेदनशील ठिकाणी जवानांचा बंदोबस्तही ठेवला
होता. परिणामी, दर दिवशी किमान अपघाती मृत्यू होणाऱ्या उपनगरीय रेल्वेमार्गावरील मृत्यूंची संख्या दर दिवशी सरासरी सहा ते सात एवढी कमी करण्यात प्रशासनाला यश आले होते. त्यापकी काही दिवशी तर ही संख्या केवळ एक किंवा दोन एवढीच होती. मात्र रविवारी २२ मे रोजी उपनगरीय रेल्वेमार्गावर तब्बल १५ प्रवाशांचा मृत्यू झाला.