पालिकेकडून लवकरच हक्काच्या जागेचे वाटप; अन्य फेरीवाल्यांकडून विरोधाची शक्यता

इंद्रायणी नार्वेकर, लोकसत्ता

मुंबई : सुमारे एक लाख अर्जदार फेरीवाल्यांपैकी केवळ १५ हजार १२० फेरीवाल्यांना मुंबई महापालिकेने अधिकृत ठरविल्याने अन्य फेरीवाल्यांकडून विरोध होण्याची शक्यता आहे. या फेरीवाल्यांची माहिती संकलित करण्याचे काम सध्या पालिके तर्फे सुरू असून लवकरच त्यांना त्यांच्या हक्काच्या जागा मिळेल. मुंबईभर पालिकेने ८५ हजार जागा निश्चित केल्या आहेत. फे ब्रुवारीत या जागांचे वाटप होण्याची शक्यता आहे.

मुंबईत फेरीवाला धोरण राबवण्याची प्रक्रीया पालिका प्रशासनातर्फे पाच वर्षांपूर्वी सुरू केली.२०१४ मध्ये पालिकेने फेरीवाल्यांचे सर्वेक्षण केले. सव्वा लाख अर्ज वितरीत करण्यात आले. एकूण ९९,४३५ फेरीवाल्यांनी अर्ज भरले. या फेरीवाल्यांकडून प्रशासनाने अधिवासाच्या प्रमाणपत्रासह कागदपत्रे मागवली होती. त्यानंतर शहर फेरीवाला समितीद्वारे अर्जाची छाननी करण्यात आली. ही छाननी पूर्ण झाली असून केवळ १५,१२० फेरीवाले पात्र ठरले आहेत. पात्र फेरीवाल्यांना लवकरच परवाने आणि फेरीवाल्याचे प्रमाणपत्र दिले जाणार असून त्यांना निश्चित जागाही दिल्या जाणार असल्याची माहिती परवाना विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

२४ वॉर्डात ज्या ठिकाणी फेरीवाल्यांना बसवता येईल अशा फेरीवाला क्षेत्राची यादीही जाहीर करण्यात आली होती. एकूण १३६६ रस्ते फेरीवाला क्षेत्र म्हणून ठरवण्यात आले आहेत. या रस्त्यांवर फेरीवाल्यांसाठी ८५,८९१ बसण्याच्या जागा अर्थात ‘पिचेस’ आखण्यात आले होते. तर दुसऱ्या बाजूला फेरीवाल्यांना पात्र-अपात्र ठरवण्याची प्रक्रीया देखील सुरू होती. पालिकेच्या अटींनुसार केवळ ५१,७८५ फेरीवाल्यांनीच कागदपत्रे सादर केली होती.

परवाने देण्यासाठी फेरीवाल्याचे वय १४ पेक्षा जास्त हवे. १ मे २०१४ पूर्वीपासून फेरीवाल्याचा व्यवसाय असणे आवश्यक आहे. तो व्यक्ती भारताचा नागरिक असावा. तसेच त्याच्याकडे महाराष्ट्रातील अधिवासाचा दाखला असावा अशा अटी ठेवण्यात आल्या होत्या.

फेरीवाल्यांचा विरोध

फेरीवाल्यांसाठी बसण्याच्या जागा ८५ हजार असल्या तरी अधिकृत फेरीवाल्यांची संख्या त्याच्या केवळ २० टक्केच असेल. त्यामुळे जागांचे वितरण सोपे होणार असले तरी अनेकांचा रोजगार धोक्यात येणार आहे. परिणामी फेरीवाले संतप्त होण्याची शक्यता आहे. तसेच या फेरीवाल्यांसाठी पालिकेने १ चौ. मीटर आकाराच्या जागा आखून दिल्या आहेत. या जागा कमी पडण्याची शक्यता असल्यामुळे अधिकृत फेरीवाल्यांकडून विरोध होण्याची शक्यता आहे.

१३६६ फेरीवाला क्षेत्र

असणारे एकूण रस्ते ८५,८९१

फेरीवाल्यांच्या एकूण जागा १,२५,000

वितरीत केलेले अर्ज   ९९,४३५

फेरीवाल्यांचे दाखल झालेले एकूण अर्ज  ५१,७८५ 

कागदपत्रे सादर केली १५,१२० पात्र फेरीवाले