News Flash

आईच्या अंत्यविधीसाठी १५ हजारांचे कर्ज

 चेंबूरच्या पांजरापोळ येथील एका लहानशा खोलीत शारदा घोडेस्वार या तीन मुलांसह राहत होत्या.

चेंबूरमध्ये झाड कोसळून मृत्युमुखी पडलेल्या शारदा घोडेस्वार यांच्या अल्पवयीन मुलांसमोर आता भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

चेंबूरमध्ये झाड पडून मृत्यू पावलेल्या महिलेच्या अल्पवयीन मुलांची व्यथा

चेंबूर येथे बसची वाट पाहात असताना अंगावर झाड कोसळून मृत्युमुखी पडलेल्या शारदा घोडेस्वार (वय ४६) यांच्या पश्चात त्यांच्या मुलांसमोरही जगण्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. एरवी अशी एखादी दुर्घटना घडल्यानंतर मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी पुढे सरसावणारे लोकप्रतिनिधी वा सामाजिक संस्थाही घोडेस्वार कुटुंबाचे हाल पाहायला फिरकलेले नाहीत. पित्यापाठोपाठ आईचेही छत्र हरपल्याने अनाथ झालेल्या १७, १६, १२ वर्षांच्या या मुलांना आईच्या अंत्यविधीसाठीही १५ हजार रुपयांचे कर्ज काढावे लागले.

चेंबूरच्या पांजरापोळ येथील एका लहानशा खोलीत शारदा घोडेस्वार या तीन मुलांसह राहत होत्या. आठ वर्षांपूर्वीच पतीने सोडून दिल्याने मुलांची जबाबदारी त्यांच्यावर पडली होती. शिक्षण नसल्याने घरकाम करुन महिन्याला ३ ते ४ हजार रुपये त्या कमवत होत्या. याच पैशांत घरखर्च भागवून मुलांच्या शिक्षणाचा खर्चही त्या कसाबसा भागवत होत्या. त्यांचा मोठा मुलगा सुमित हा बारावीत असून दुसरा सुशांत दहावीत शिकत आहे, तर, १२ वर्षांची स्वप्नाली सध्या सातवीत आहे. आर्थिक ओढाताण सहन करत शारदा घोडेस्वार मुलांच्या उज्ज्वल भवितव्याची स्वप्ने पाहात असतानाच काळाने त्यांच्यावर झडप घातली. ७ डिसेंबर रोजी घरकाम करून परतत असताना चेंबूरच्या डायमंड गार्डनजवळील बसथांब्याजवळ उभ्या असलेल्या शारदा यांच्या अंगावर झाड कोसळले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

आईच्या मृत्यूची बातमी समजताच तिन्ही मुले कोसळून गेली. आधीच पित्याचे छत्र नसलेल्या या मुलांनी आईही गमावल्याने ही मुले अनाथ झाली आहेत. तशा अवस्थेतही सुमितने धैर्य दाखवत आईचा मृतदेह ताब्यात घेतला. शारदा घोडेस्वार यांच्या मृत्यूचे वृत्त समजताच नातेवाईक आणि काही राजकीय मंडळींनी तत्काळ रुग्णालयात धाव घेतली; परंतु अंत्यविधीच्या खर्चासाठी कोणीच खिशात हात घातला नाही. याच दरम्यान सुमितने एका इसमाकडून पाच हजार रुपये कर्ज घेऊन अंत्यविधी पार पाडला. त्यानंतर पुन्हा आईचे कार्य करण्यासाठी पैशांची गरज होती. त्यामुळे पुन्हा एकदा सुमितने दहा टक्के व्याजाच्या बोलीवर १० हजार रुपये कर्ज काढले.

आईच्या निधनानंतर सध्या ही तिन्ही मुले आजीकडे वास्तव्यास आहेत. मात्र भविष्यात आपले काय होईल याची चिंता या तिन्ही मुलांना भेडसावत आहे. नोकरी करायची तर शिक्षण पूर्ण होणार नाही आणि शिक्षण सुरू ठेवल्यास शिक्षणाचा खर्च आणि दोन भावंडांचा खर्च कसा भागवणार, असा प्रश्न सुमितसमोर आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 15, 2017 2:52 am

Web Title: 15 thousand loan for mother funeral
Next Stories
1 वीजग्राहकांना २०० कोटींचा भुर्दंड
2 विद्यापीठाकडून परीक्षा शुल्कात कपात
3 दादरच्या पुलाखाली उद्यान, जॉगिंग ट्रॅक
Just Now!
X