करोना व्हायरसने आता भारतीय नौदलातही शिरकाव केला आहे. मुंबईतील नौदलाच्या तळावरील १५ ते २० नौसैनिकांना करोना व्हायरसची लागण झाली आहे. त्यांचे करोना चाचणीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. मुंबईतीलच नौदलाच्या रुग्णालयात या नौसैनिकांना क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले आहे. एनडीटीव्हीने हे वृत्त दिले आहे.

भारतीय नौदलात करोना व्हायरसची लागण होण्याचे ही पहिलीच घटना आहे. या नौसैनिकांच्या संपर्कात आलेल्यांना शोधून काढण्यासाठी मोठी शोध मोहिम सुरु झाली आहे. मुंबईच्या किनाऱ्यावर नौदलाचा आयएनएस आंग्रे हा तळ आहे.या तळावरच नौसैनिकांची निवासस्थाने आहेत. आयएनएस आंग्रेवरुन पश्चिम नौदल कमांडच्या वेगवेगळया ऑपरेशन्ससाठी रसद आणि प्रशासकीय मदत दिली जाते.

नौदल तळाच्या परिसरातच आवश्यक कामांसाठी हे नौसैनिक फिरले असावेत असा नौदलाचा अंदाज आहे. लॉकडाउनमुळे आयएनएस आंग्रे तळावरील निवासी वसाहती असलेल्या भागांमध्ये नौसैनिक फिरत नाहीत. नौदलाच्या युद्धनौकांवर तैनात असलेले नौसैनिक आणि अधिकाऱ्यांना करोनाची बाधा झाली आहे किंवा नाही हे अजून स्पष्ट झालेले नाही.

करोनाची लागण झालेल्या नौसैनिकांची आयएनएचएस अश्विनीमध्ये क्वारंटाइनची व्यवस्था करण्यात आली आहे. हे नौदलाचे मुंबईतील रुग्णालय आहे. मुंबईतील नौदलाचे युनिट आणि युद्धनौकांना या तळावरुन वेगवेगळया सुविधा पुरवल्या जातात.

देशात Covid-19 रुग्णांची संख्या १४ हजारच्या घरात पोहोचली आहे. एकटया महाराष्ट्रात करोनाचे ३२०५ रुग्ण आहेत. देशात मुंबईमध्ये करोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. भारतात आता १३८३५ करोना रुग्ण आहेत. त्यात ४५२ जणांचा मृत्यू झाला आहे.