News Flash

लोखंड, सिमेंटसह बांधकाम साहित्यामध्ये १५ ते ५० टक्कय़ांची वाढ!

घरांच्या किमतीवर परिणाम

घरांच्या किमतीवर परिणाम

निशांत सरवणकर, लोकसत्ता

मुंबई : करोनाच्या दुसऱ्या लाटेला सामोरे जाताना आलेल्या निर्बंधावर मात करण्याचा प्रयत्न करणाऱ्या विकासकांना लोखंड, सिमेंटसह इतर बांधकाम साहित्यामध्ये १५ ते ५० टक्कय़ांची वाढ सहन करावी लागली आहे. अशामध्ये घरांच्या किमती वाढविण्याशिवाय त्यांना पर्याय उरलेला नाही. एकीकडे एप्रिल महिन्यापासून घर खरेदीदारांची संख्या खूपच कमी झाल्याने चिंतेत असलेल्या या विकासकांनी आता पुन्हा एकदा लोखंड, सिमेंटसह इतर बांधकाम साहित्याच्या किमतींवर नियंत्रण असावे, अशी मागणी केंद्र सरकारकडे केली आहे.

करोनाच्या पहिल्या लाटेनंतर जेव्हा बांधकाम क्षेत्र सक्रिय झाले तेव्हा लोखंड व सिमेंटमध्ये १० ते २० टक्के वाढ  होती. तेव्हा विकासकांचे नेतृत्त्व करणाऱ्या नॅशनल रिएल इस्टेट डेव्हलपर्स कौन्सिल (नरेडको), महाराष्ट्र चेंबर्स ऑफ हौसिंग इंडस्ट्री (एमसीएचआय) आणि कॅान्फर्डेशन ऑफ रिएल इस्टेट डेव्हलपर्स (क्रेडाई) या संघटनांनी केंद्र सरकारला पत्र लिहून लोखंड व सिमेंटचे दर नियंत्रित करण्याची मागणी केली होती. परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. आता गेल्या तीन महिन्यात लोखंडाचे दर टनामागे २० हजार रुपयांनी वाढले आहेत. फेब्रुवारी महिन्यात हे दर ४० हजार रुपये प्रतिनिधी होते ते आता ६० हजार रुपये इतके झाले आहेत. ही ५० टक्के वाढ असून ती अन्यायकारक आहे. याशिवाय कॅापर, अल्युमिनिअमसह इतर साहित्यांच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे घरनिर्मितीच्या दरावरही परिणाम झाला आहे, याकडे नरेडकोचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र हिरानंदानी यांनी लक्ष वेधले.

लोखंडापाठोपाठ सिमेंटच्या किमतीत १५ टक्कय़ांनी वाढ झाली आहे. परवडणारी घरे उपलब्ध करून देण्याची शासनाची इच्छा असेल तर बांधकाम साहित्यावरील दरांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक असल्याचे मत मुंबईत परवडणाऱ्या घरांची निर्मिती करणाऱ्या प्लॅटिनम कॅार्पचे विशाल रतनघायरा यांनी सांगितले. लोखंड, सिमेंटच नव्हे तर इतर साहित्यांमध्ये २० ते ३५ टक्के वाढ झाल्याने बांधकामाचा खर्च २६ टक्कय़ांनी वाढला आहे. डिझेलच्या दरात वाढ झाल्याने बांधकाम साहित्याच्या वाहतूक दरावरही परिणाम झाला आहे. मजुरांचे आरोग्य व सुरक्षा हा अतिरिक्त खर्च तसेच रेती, दगड, लाकूड आदी सर्वांच्या किमती वाढल्या आहेत, याकडे रतनघायरा यांनी लक्ष वेधले. मुद्रांक शुल्कात कपात झाल्याने घरखरेदीदारांनी उत्साह दाखविला. तो थंडावला असला तरी तो काही दिवसांत पुन्हा वाढेल. अशावेळी बांधकाम साहित्याचे दर नियंत्रित राहिले तर आम्हा विकासकांनाही परवडणाऱ्या दरात घरांची विक्री करता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. बांधकाम साहित्याचे दर नियंत्रित ठेवणे आवश्यक असल्याचे मत पोद्दार हौसिंगचे व्यवस्थापकीय संचालक रोहित पोद्दार यांनी व्यक्त केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 18, 2021 1:56 am

Web Title: 15 to 50 percent increase in construction materials including iron and cement zws 70
Next Stories
1 दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय ; निकालाचे सूत्र अनिश्चित
2 वादळामुळे मुंबईकरांची दैना
3 पावसाचा रुग्णसेवेवर विशेष परिणाम नाही
Just Now!
X