राष्ट्रवादी काँग्रेस १४ वर्षे पूर्ण करून सोमवारी १५व्या वर्षांत पदार्पण करीत असतानाच पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी आगामी निवडणुकीत पक्षाची कामगिरी सुधारण्याच्या उद्देशाने सरकार आणि संघटनेत बदल करण्याचे घाटले आहे. एकूणच राजकीय परिस्थिती लक्षात घेता राष्ट्रवादीसाठी निवडणुका सोप्या नाहीत हेच पवार यांच्या कृतीवरून स्पष्ट होते.
अलीकडेच घेण्यात आलेल्या जनमत चाचण्यांमध्ये राष्ट्रवादीची पीछेहाट होत असल्याचे अंदाज समोर आले. विविध मंत्र्यांवर होणाऱ्या आरोपांमुळे राष्ट्रवादीची प्रतिमा आधीच खराब झाली आहे. मित्र पक्ष काँग्रेस कुरघोडय़ा करण्याची संधी सोडत नाही. या पाश्र्वभूमीवर पक्षसंघटना आणि सरकारमध्ये फेरबदल करून पक्षाची प्रतिमा सुधारण्यावर पवार यांचा भर दिसतो.
भाजपने नरेंद्र मोदी यांच्याकडे आगामी निवडणुकीची सूत्रे सोपावून तरुण वर्गाला आकर्षित करण्यावर भर दिला. राष्ट्रवादीला तरुण वर्गाला आकर्षित करावे लागणार आहे. यामुळेच प्रदेशाध्यक्षपदी तरुण चेहरा पुढे केला जाईल, अशी शक्यता आहे. आर. आर. पाटील यांच्या प्रतिमेचा राष्ट्रवादीला यापूर्वीही लाभ झाला होता. त्यातूनच पक्षाची सूत्रे त्यांच्याकडे सोपविली जाऊ शकतात.
गेल्या वर्षी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये मिळालेल्या यशानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला होता. पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सिंचन घोटाळ्याचे झालेले आरोप, त्यातून राजीनामा आणि परत मंत्रिमंडळात येणे यामुळे पक्ष आणि अजितदादांच्या प्रतिमेवर परिणाम झाला. दुष्काळावरून केलेल्या वक्तव्यांमुळे अजितदादा तर चांगलेच अडचणीत आले. एकूणच राष्ट्रवादीसाठी परिस्थिती तेवढी सोपी राहिलेली नाही याचा अंदाज पवार यांनाही आला.
आगामी लोकसभा निकालानंतर सत्तेच्या राजकारणात महत्त्व वाढवायचे असल्यास खासदारांची कुमक आवश्यक असल्यानेच पवार यांनी ज्येष्ठ मंत्र्यांना रिंगणात उतरविण्याचे ठरविले आहे. काहीही करून महाराष्ट्रातून १२ ते १५ खासदारांची कुमक उभी करण्याचे पवार यांचे उद्दिष्ट आहे. छगन भुजबळ यांचा अपवाद वगळता अन्य कोणताही मंत्री स्वत:हून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास फारसा उत्सुक दिसत नाही.
पवार यांची भाकरी आणि अस्वस्थता
‘भाकरी फिरवली नाही तर ती करपते’ असे सांगत शरद पवार यांनी यापूर्वीही अनेकदा नेतेमंडळींना अस्वस्थ केले होते. आता सर्व २० मंत्र्यांचे राजीनामे घेतल्याने मंत्री तसेच मंत्रिमंडळात येऊ इच्छिणारे हे सारेच अस्वस्थ आहेत. पक्षाच्या वर्धापनदिनावर याचेच सावट आहे. नक्की काय होणार याचा कोणालाच थांगपत्ता नसल्याने अधिकच गोंधळाचे वातावरण आहे. तीन ते चार मंत्र्यांना घरी पाठविण्याचे संकेत पक्षाच्या नेत्यांकडून दिले जात असले, तरी त्यात कोणाचा क्रमांक लागणार याबाबत साऱ्याच मंत्र्यांमध्ये चलबिचल आहे. प्रदेशाध्यक्षपदासाठी आर. आर. पाटील किंवा जयंत पाटील यांच्यापैकी एकाची नियुक्ती केली जाईल, अशी चिन्हे आहेत.