दहा खाटांचा अतिदक्षता विभागही सुरू होणार

शैलजा तिवले, लोकसत्ता

मुंबई :  शहरातील नायर, सेव्हनहिल्स, कस्तुरबा, सेंट जॉर्ज आणि जीटी ही पाच करोना रुग्णालयांसह आता कांदिवली कामगार रुग्णालयातही करोना १५० खाटांचे करोना रुग्णालय सुरू होणार आहे. यात दहा खाटांचा अतिदक्षता विभागही असणार आहे. शहरात रुग्णांची वाढत्या संख्या आणि अपुऱ्या खाटा यामुळे आता कामगार रुग्णालयांमधील खाटांची संख्या वाढविण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

कांदिवली येथील कामगार रुग्णालयात ३०० खाटांची क्षमता आहे. मरोळच्या कामगार रुग्णालयाला आग लागल्यानंतर तेथील सर्व कर्मचारी सध्या या रुग्णालयात कार्यरत आहेत. यातील ६७ खाटा करोनाबाधित कामगारांसाठी रुग्णालयाने राखीव ठेवलेल्या आहेत. राज्य कामगार रुग्णालयांमध्ये सध्या कांदिवली येथे करोना उपचाराची सुविधा असल्याने वरळी, मुलुंड अन्य रुग्णालयातून रुग्ण येथे पाठविले जातात.

या व्यतिरिक्त पालिकेने येथे ६३ खाटा करोना रुग्णांसाठी सुरू केलेल्या आहेत. याची संख्या वाढवून १५० पर्यत नेण्याचा प्रस्ताव पालिकेने मंजूर केला आहे. पालिकेचे अधिकारी आणि राज्य कामगार विभागाचे अधिकारी यांनी गुरुवारी रुग्णालयाची पाहणी करून पुढील नियोजन केले.

पालिकेच्या ६३ खाटांपैकी २२ खाटांना ऑक्सीजनची सुविधा आहे. आणखी ८७ खाटा लवकरच उभारल्या जाणार असून सर्व खाटांना ऑक्सीजनची सुविधा सुरु केली जाईल. तसेच दहा खाटांचा अतिदक्षता विभागही सुरू करण्यात येणार आहे. कामगार रुग्णालयाच्या आणि पालिकेच्या अशा एकत्रित २०० हून अधिक खाटांवर करोना रुग्णांना उपचार दिले जातील, असे रुग्णालय प्रशासनाने सांगितले. कामगार रुग्णालयातील करोनाव्यतिरिक्त इतर आजारांसाठीही काही खाटा राखीव ठेवल्या जातील.

रुग्णालयात सध्या ४ तज्ज्ञ डॉक्टरांसह २२ बंधपत्रित सेवेतील डॉक्टर उपलब्ध आहेत. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात खाटा सुरू करण्यासाठी हे मनुष्यबळ अपुरे आहे.

मरोळ रुग्णालयाची उणीव

आगीत जळून खाक झालेल्या मरोळ कामगार रुग्णालयाचे कामकाज दीड वर्ष झाले तरी पूर्ण झालेले नाही. सर्व तांत्रिक सुविधांसह असलेले ३५० खाटांचे रुग्णालय सुरू असते तर सध्याच्या आणीबाणीच्या परिस्थितीत पश्चिम उपनगरातील रुग्णांना मोठा दिलासा मिळाला असता. परंतु दुर्लक्ष केल्याने रुग्णालयातील प्रशासकीय कामकाजाचे कार्यालयही तीन वेळेस हलविण्याची वेळ आली असल्याचे रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.