तळोजा एमआयडीसी परिसरातील उल्का सी फ्रुड प्रा. लि. कंपनीमध्ये धाड टाकून पोलिसांनी १५० बालकामगारांची सुटका केली आहे.
 या कंपनीत मोठय़ा प्रमाणात बालकामगार मुले-मुली काम करत असल्याची तक्रार नवी मुंबई पोलीस आयुक्त के.एल. प्रसाद यांना मिळाली होती. या तक्रारीनुसार  कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी गुन्हे शाखाला दिले होते. त्यानुसार गुन्हे शाखा आणि तळोजा पोलीस यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
या कंपनीच्या आवारातील झोपडीमध्ये ही मुले-मुली राहत होती. यामध्ये आसाम, ओरिसा, उत्तर प्रदेश या राज्यांतील मुलांचा समावेश आहे. या मुलांकडून पॅकिंगची कामे करून घेण्यात येत होती, असे पोलिसांनी सांगितले.