28 May 2020

News Flash

चेंबूरमध्ये दीडशे वाहनांची मोडतोड

बुधवारी पहाटे सहाच्या सुमारास चेंबूरच्या आरसीएफ तलावाजवळ एका शाळेच्या बसची तोडफोड करण्यात आली.

सलग दुसऱ्या दिवशी तणावग्रस्त परिस्थिती; दगडफेक, जाळपोळीच्या घटना

भीमा कोरेगाव येथे दलित जमावावर करण्यात आलेल्या दगडफेक व हल्ल्यानंतर पेटलेले चेंबूर बुधवारीही धुमसत राहिले. प्रकाश आंबेडकर यांच्या संघटनेच्या वतीने पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी बंददरम्यान बुधवारी चेंबूर परिसरात कडकडीत बंद होता. या ठिकाणी पोलिसांचाही कडेकोट बंदोबस्त होता. परंतु, तरीही चेंबूर भागात विविध ठिकाणी वाहनांची मोडतोड व दगडफेकीच्या घटना घडल्या. आंदोलनकर्त्यांनी स्थानिकांच्या १५० वाहनांची मोडतोड केल्याने रहिवासी विरुद्ध आंदोलक अशा दोन गटांत दगडफेकही झाली. त्यामुळे दिवसभर चेंबूरमध्ये तणावग्रस्त वातावरण होते.

बुधवारी पहाटे सहाच्या सुमारास चेंबूरच्या आरसीएफ तलावाजवळ एका शाळेच्या बसची तोडफोड करण्यात आली. त्यानंतर काही वेळातच चेंबूर नाका परिसरात एका बेस्ट बसची तोडफोड झाली. तोंडावर रुमाल बांधून आलेल्या तीन ते चार जणांनी अचानक बसवर हल्ला चढवला. घटनास्थळापासून काही अंतरावर तैनात असलेल्या पोलिसांना हे दृश्य दिसताच त्यांनी बसच्या दिशेने धाव घेत आतील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले.

दरम्यान दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास चेंबूर पांजरापोळ सर्कल येथे आंदोलकांनी शीव-पनवेल महामार्ग आणि पूर्व द्रुतगती महामार्ग पूर्णपणे बंद केला. चारशे ते पाचशे आंदोलक रस्त्यावर उतरल्याने पोलिसांनी त्यांची समजूत काढून रस्त्याच्या बाजूला आंदोलन करण्याची त्यांना विनंती केली. मात्र आंदोलनकर्त्यांनी दोन तास येथील वाहतूक अडवून ठेवल्याने अखेर पोलिसांनी लाठीचार्ज करत या आंदोलकांना बाजूला केले.

गोवंडीतील निंबोनी बाग परिसरातील आंदोलकांनी गोवंडी उड्डाणपुलावरील वाहतूक रोखून धरली. या ठिकाणी पोलिसांची संख्या कमी असल्याने आंदोलकांनी दोन बेस्ट बसची मोडतोड केली. तेथून चेंबूरच्या खारदेवनगरकडे सरकलेल्या आंदोलकांनी परिसरात दिसतील ती वाहने फोडण्यास सुरुवात केली. यात दीडशेहून अधिक वाहनांचे नुकसान झाले.

ही वाहने परिसरातील रहिवाशांची असल्याने मोडतोडीचे वृत्त समजताच, स्थानिक नागरिक मोठय़ा प्रमाणात रस्त्यावर उतरले. यावेळी दोन्ही बाजूंनी दगडफेक सुरू झाली. पोलिसांनी यावेळी लाठीमार करत जमावाला पांगवले. मात्र, थोडय़ा वेळातच आचार्य महाविद्यालय परिसरात खारदेवनगर रहिवासी व आनंदनगर रहिवासी असा संघर्ष पेटला. या ठिकाणी झालेल्या दगडफेकीत काही रहिवासी आणि पोलीस जखमी झाले.  सायंकाळी पाचनंतर येथील परिस्थती नियंत्रणात आली होती. मात्र या ठिकाणी पुन्हा दगडफेक होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी या ठिकाणी अधिक फौजफाटा मागवला  होता.

आज नेहमीप्रमाणे हार्बर आणि मध्य रेल्वे मार्गावरची वाहतूक सुरळीत होती. मात्र सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास गोवंडी रेल्वे स्थानकात आंदोलक जमा झाले व हार्बर रेल्वेची वाहतूक बंद पाडण्यात आली. दुसरीकडे, घाटकोपर स्थानकातही रेल्वे रुळांवर उतरत आंदोलकांनी मध्य रेल्वेची वाहतूक रोखून धरली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 4, 2018 3:16 am

Web Title: 150 vehicles debris in chembur bhima koregaon violence effect
Next Stories
1 बंदचे बदललेले तंत्र
2 भाजपकडे वळलेल्या दलित मतांवर काँग्रेसचा डोळा
3 सुमारे तीन हजार कोटींचा फटका?
Just Now!
X