मधु कांबळे, लोकसत्ता

मुंबई : कोकण किनारपट्टीला धडक लेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे उद्ध्वस्त झालेली शेती, घरे, शाळा पुन्हा नव्याने उभ्या करण्यासाठी तसेच आपदग्रस्तांना तातडीच्या मदतीकरिता जवळपास १५०० कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. राज्य सरकारने ती तयारी के ली आहे, अशी माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

या चक्रीवादळाचा सगळ्यात मोठा तडाखा रायगड रत्नागिरी जिल्ह्य़ाला बसला आहे. दोन्ही जिल्ह्य़ांतील मिळून जवळपास २२ हजार हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. त्यात फळबागांचा मोठा समावेश आहे. आंबा, काजू, नारळ यांचे इतके  नुकसान झाले आहे की, पुढे पाच-दहा वर्षे शेतकऱ्यांच्या हातात काहीही मिळणार नाही, अशी परिस्थिती आहे. शेतीवर अवलंबून असणाऱ्या जवळपास ६५ हजार कु टुंबांना त्याचा फटका बसला आहे. घरांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. १४७० शाळांची पडझड झाली आहे. त्यात पुणे जिल्ह्य़ातील एक-दोन तालुक्यांतील काही शाळांचाही समावेश आहे.

नुकसान फार मोठे आहे. प्रचलित निकषानुसार आपदग्रस्तांना आपण फार काही दिलासा देऊ शकत नाही. त्यामुळे केंद्राच्या राष्ट्रीय आपत्ती निवारणाच्या निकषापेक्षा अडीच ते तीन पट अधिक मदत देण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. १५ टक्क्यांपर्यंत घराचे नुकसान झाले असेल तर १५ हजार रुपये, कपडे व घरातील साहित्य खरेदीसाठी १० हजार रुपये दिले जाते. १५ ते २५ टक्क्यांपर्यंत नुकसानीला २५ हजार अधिक १० हजार कपडे व साहित्यासाठी, २५ ते ५० टक्क्यापर्यंत हानी झाली असेल, तर ५० हजार रुपये अधिक १० हजार रुपये आणि संपूर्ण घर नष्ट झाले असेल तर १ लाख ५० हजार अधिक १० हजार रुपये अशी मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १४७० शाळांचे नुकसान झाले आहे, त्यांची दुरुस्ती किं वा नवीन बांधणीसाठी २४ कोटी ५० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत, अशी माहिती वडेट्टीवार यांनी दिली.

निकषांत बदल.. : शेतीचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यासाठी निकष बदलून हेक्टरी १८ हजार ऐवजी ५० हजार रुपये इतकी दोन हेक्टपर्यंतच्या नुकसानीसाठी भरपाई दिली जाणार आहे. पूर्वी नारळचा फळबागांमघ्ये समावेश नव्हता, तो आता करून घेतला. त्यामुळे नारळांच्या बागांचे नुकसान झाले आहे, त्यांनाही मदत दिली जाणार आहे. ज्यांच्या फळबागा पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या आहेत, त्यांना पुन्हा रोपण करून दिल्या जाणार आहेत. केवळ फांद्या तुटलेल्या आहेत, अशा आंब्यांच्या झांडाचे पुनरुज्जीवन करून देण्यात येणार आहे. नुकसानीचे बरेच पंचनामे झाले आहेत, काही थोडे अजून व्हायचे आहेत. परंतु साधारणत चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई व पुनर्वसन यासाठी राज्य सरकारला १५०० कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत आणि सरकारने ती तयारी  केली आहे, असे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

भूमिगत वीज वाहिन्यांसाठी..

अतिवृष्टी, वादळवारा आला की वीजेचे खांब वाकणे, पडणे त्यामुळे वारंवार वीज खंडित होणे, अशा समस्येला किनारपट्टीवरील गावांना तोंड द्यावे लागते. ही समस्या कायमची सोडविण्यासाठी संपूर्ण कोकण किनारपट्टीवर भूमिगत वीज वाहिन्या टाकण्याचे ठरविण्यात आले असून, त्यासाठी ४०० कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली.