ठाकुर्लीजवळील चोळे गावात इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर मुंबईमधील अतिधोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वीज आणि पाणीपुरवठा खंडित केल्यानंतरही बहुसंख्य इमारतींमध्ये रहिवासी वास्तव्यास आहेत. तर ३५० हून अधिक अतिधोकादायक इमारतींबाबत पालिकेची आजही कारवाईच सुरू आहे. मूळ ठिकाणी घर मिळेल की नाही याची शाश्वती नसल्यामुळे, तसेच संक्रमण शिबिरांत खितपत पडावे लागेल या भीतीपोटी रहिवासी आजही मोडकळीस आलेल्या इमारतीच्या आश्रयाला आहेत. त्यामुळे अतिधोकादायक इमारतींचा प्रश्न गंभीर बनला आहे.
पावसाळ्यापूर्वी पालिकेने केलेल्या पाहणीमध्ये मुंबईत ७१२ इमारती अतिधोकादायक स्थितीत असल्याचे आढळून आले होते. जीवितहानी होऊ नये म्हणून इमारत रिकामी करण्याची नोटीस पालिकेने रहिवाशांवर बजावली होती. यापैकी १५३ इमारतींमधील रहिवाशांनी धोका ओळखून घरे रिकामी केली आणि पर्यायी घराचा रस्ता धरला. त्यामुळे या इमारती तोडून टाकण्यात आल्या.
नोटीस बजावूनही १८० इमारतींमधील रहिवाशांनी आपले घर रिकामे करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे पालिकेने या इमारतींचा वीज आणि पाणीपुरवठा खंडित केला आहे. वीज आणि पाणीपुरवठा खंडित केल्यानंतरही यापैकी अनेक इमारतींमध्ये आजही रहिवासी वास्तव्यास आहेत. तर उर्वरित २७९ अतिधोकादायक इमारतींबाबत पालिकेची कारवाई सुरू असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.
भीतीचे ‘संक्रमण’
अनेक अतिधोकादायक इमारती मोक्याच्या ठिकाणी आहेत. या इमारतींमधील घर रिकामे करून पर्यायी घरात गेल्यानंतर मूळ ठिकाणी नवी इमारत कधी उभी राहणार, नव्या इमारतीत घर मिळणार की नाही, संक्रमण शिबिरातील सुविधा कशा असतील, असे अनेक प्रश्न या रहिवाशांना भेडसावत आहेत. इमारतीचे बांधकाम रखडल्यास संक्रमण शिबिरात खितपत पडावे लागेल, या भीतीपोटी ही मंडळी घर रिकामे करण्यास तयार नाहीत. मात्र या इमारतींची स्थिती गंभीर बनली असून तातडीने इमारत रिकामी करण्याची गरज आहे, असे या अधिकाऱ्याने सांगितले.