राज्यात करोनाचा संसर्ग अद्यापही झपाट्याने वाढत आहे. मुंबई व पुणे या दोन्ही प्रमुख शहरांमध्ये आढळणाऱ्या करोनाबाधितांची संख्या अधिक आहे. शिवाय, करोनामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येतही दररोज भर पडत आहे. आज दिवसभरात मुंबईत करोनामुळे ४९ रुग्णांचा मृत्यू झाला. तर १ हजार ५८५ नवे करोनाबाधित आढळले.

मुंबईतील करोनाबाधितांची एकूण संख्या  १ लाख ७३ हजार ५३४ वर पोहचली आहे. यामध्ये ३० हजार ८७९ अॅक्टिव्ह रुग्ण, करोनामुक्त झालेले १ लाख ३४ हजार ६६ जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या ८ हजार २२७ जणांचा समावेश आहे. मुंबई महापालिकेच्यावतीने ही माहिती देण्यात आली आहे.

महाराष्ट्रात दिवसभरात २० हजार ४८२ करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यासोबत राज्यातील करोनाबाधित रुग्णसंख्या १० लाख ९७ हजार ८५६ वर पोहोचली आहे. दिवसभरात १९ हजार ४२३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात आतापर्यत ७ लाख ७५ हजार २७३ करोनाबाधित रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ७०.६२ टक्के इतकं झालं आहे. राज्यात सध्या २ लाख ९१ हजार ७९७ अॅक्टिव्ह केसेस आहेत.