गेल्या पाच महिन्यांत १६ जण डेंग्यूने दगावले

ऑक्टोबर महिन्यात शहरात एच१एन१ विषाणूचा संसर्ग झालेले १६ रुग्ण आढळले आहेत. स्वाइन फ्लूचा फैलाव या वर्षी उशिरा सुरू झाला असला तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये या आजाराची लागण झालेल्या रुग्णांची संख्या नोंद घेण्याइतपत आहे. तसेच डेंग्यूमुळे दोन जण दगावले असून २४९ रुग्णांची नोंद झाली आहे. सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत डेंग्यूच्या रुग्णांची संख्या घटली असली तरी गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यापेक्षा या वर्षी ही संख्या अधिकच आहे. त्यामुळे डेंग्यूचा प्रादुर्भाव शहरात अजूनही कायम आहे. या वर्षीच्या पावसाळ्यात डेंग्यूमुळे १४ जणांचा मृत्यू झाला आहे.

ऑक्टोबर महिन्यामध्ये सर्वसाधारणपणे डेंग्यूचा प्रादुर्भाव कमी होतो. सप्टेंबर महिन्यामध्ये पाच जणांचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला असून ३९८ डेंग्यूचे रुग्ण आढळले होते. त्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये रुग्णांच्या संख्येत घट झाली असून २४९ रुग्ण आढळले. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या २१२ होती. त्या तुलनेत या वर्षी ही संख्या वाढलेलीच आहे. तसेच डेंग्यूच्या संशयित रुग्णांची संख्या गेल्या वर्षी याच काळात ३२९३ होती, तर या वर्षी ३८७५ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे शहरात डेंग्यूचा फैलाव अजूनही असल्याचे स्पष्ट होते.

कांदिवली पश्चिम भागातील २४ वर्षीय तरुणाचा ११ ऑक्टोबर रोजी डेंग्यूने मृत्यू झाला आहे. व्यवसायाने कपडे धुलाईचे काम करणाऱ्या या तरुणाला ताप, उलटीचा त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल केले होते. या घटनेनंतर ७५० कुटुंबांचे सर्वेक्षण पालिकेने केले असून चार तापाचे रुग्ण आढळले. ३१२ पाण्याच्या टाक्यांची तपासणी केली गेली. ३८२ घरांमध्ये धूम्रफवारणी केली आहे.

धारावी येथील सात वर्षांच्या मुलाचा डेंग्यूने मृत्यू झाला आहे. ताप, अंगदुखी, पोटदुखी या तक्रारींसह त्याला रुग्णालयात दाखल केले होते. या पाश्र्वभूमीवर ५१० कुटुंबांचे सर्वेक्षण पालिकेने केले आहे. ५२० पाण्याच्या टाक्यांची तपासणी असून यातील पाच टाक्यांमध्ये डेंग्यूच्या डासांच्या अळ्यांची उत्पत्तिस्थाने आढळली आहेत. १२२ घरांमध्ये धूम्रफवारणी केली आहे.

जानेवारी ते ऑक्टोबर या काळात शहरातील पालिका रुग्णालयात एच१एन१ विषाणूचा संसर्ग झालेल्या १७ रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी १६ रुग्णांची नोंद ऑक्टोबर महिन्यात झाली आहे. गेल्या वर्षी याच काळात ५ रुग्णांची नोंद झाली होती. त्या तुलनेत या वर्षी रुग्णांची संख्या अधिक आहे. हे रुग्ण शहरात एकाच भागात आढळले नसून सर्वत्र पसरलेले आहेत. संसर्ग झालेल्या रुग्णांचा वयोगट १५ ते ६० वर्षांपर्यंतचा आहे.