सार्वजनिक बांधकाम विभागात नोकरी लावण्याच्या आमिषाने शहापूर, मुरबाड व कल्याण परिसरातील सोळा बेरोजगारांकडून प्रत्येकी तीन लाखांहून अधिक पैसे उकळून त्यांची फसवणूक करणाऱ्या मुरबाड येथील पत्रकार व मंत्रालयातील दोन निवृत्त अधिकाऱ्यांविरुद्ध शनिवारी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोपी संतोष खंडू गायकर हा पत्रकार तर पल्लडवार व प्रकाश पाठक हे मंत्रालयातील निवृत्त सरकारी अधिकारी आहेत. शहापूर येथील नरेंद्र सासे यांना चेतन भानुशाली (रा. किन्हवली), अरुण राऊत (रा. खरीड) यांनी सार्वजनिक बांधकाम विभागात भरती असून नोकरी मिळवून देण्याचे काम मुरबाडचा पत्रकार संतोष गायकर करणार आहे असे सांगितले.
पत्रकार असल्याने विश्वासाने काम करील या आशेने नरेंद्रने नोकरी लागण्यासाठी संतोषला चार लाख रुपये गेल्या तीन वर्षांपूर्वी दिले. दरम्यानच्या काळात संतोषने ठाणे जिल्हा शल्य चिकित्सक, ठाणे पोलीस अधीक्षक यांची बनावट पत्रे, नोकरीची प्रवेशपत्रे तयार करून नरेंद्रची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.
अनेक दिवस होऊनही संतोष नोकरी मिळवून देत नाही म्हणून नरेंद्रने पैसे परत देण्याचा तगादा लावला. त्यामुळे संतोषने, माझ्या घरी येऊ नका नाहीतर पत्नीचा विनयभंग केला म्हणून गुन्हा दाखल करण्याची धमकी नरेंद्र आणि इतर युवकांना देऊ लागला.
आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यावर नरेंद्र सासे यांनी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे, असे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पाटील यांनी
सांगितले.
कलाकारांच्या आरोग्य तपासणी मोहिमेस सुरुवातमुंबई : शिवसेना चित्रपट शाखेतर्फे मुंबईतील विविध चित्रीकरण स्थळी कलाकार आणि तंत्रज्ञ यांची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. अभिनेते आणि नृत्य दिग्दर्शक प्रभुदेवा यांच्या प्रमुख उपस्थितीत या उपक्रमाची सुरुवात रविवारी गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी येथे झाली. महिनाभर हा उपक्रम सुरू राहणार आहे.
सततचे चित्रीकरण, कामाचा व्याप यामुळे कलाकारांना आपल्या आरोग्याकडे तसेच नियमित वैद्यकीय तपासणी करण्याकडे म्हणावे तितके लक्ष देता येत नाही. या मंडळींची वैद्यकीय तपासणी झाली तर नेमका आजार, त्यावरील उपचार सुरू करणे शक्य होईल आणि त्याच उद्देशाने शिवसेना चित्रपट शाखेने कलाकार आणि तंत्रज्ञ यांची विनामूल्य वैद्यकीय तपासणी करण्याचा हा उपक्रम हाती घेतला आहे.
डॉ. अनिरुद्ध आंबेकर आणि त्यांचे सहकारी डॉक्टर्स यांचे बहुमोल सहकार्य या उपक्रमास मिळाले असल्याची माहिती शिवसेना चित्रपट शाखेचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी  ‘लोकसत्ता’ला दिली.