यंदा पावसाने उशिरा पण दमदार हजेरी झाल्याने राज्यातील जनतेला दिलासा मिळाला आहे. नदी, ओढे, नाले, विहिरी आणि लहान-मोठय़ा तलावांमधील पाणीसाठा वाढला आहे. त्याचा चांगला परिणाम म्हणजे राज्यातील १६ जिल्ह्यांमधून टँकर हद्दपार झाले आहेत. तर पाच जिल्ह्यांमध्ये दहा-वीस गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
राज्यात गेल्या महिनाभरात बहुतांश भागात पावसाने चांगली हजेरी लावली आहे. मराठवाडय़ात मात्र पावसाचे प्रमाण कमी आहे. तरीही राज्य सकारने गेल्याच आठवडय़ात १२३ तालुक्यांमध्ये टंचाई परिस्थिती जाहीर केली आहे. परंतु गेल्या दोन वर्षांपासून पाणी टंचाईवर मात करण्यासाठी छोटे-छोटे तलाव, सिमेंट बंधारे, बांधण्याची मोहीम सरकारने हाती घेतली. त्याचा आता चांगला परिणाम दिसू लागला आहे.  
कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड व ठाणे, विदर्भातील नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अकोला, खानदेशातील धुळे, नंदूरबार, पाश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर  आणि मराठवाडय़ातील परभणी या जिल्ह्यांमध्ये एका गावात अथवा वाडीत एकाही टॅंकरचा पिण्याच्या पाण्यासाठी वापर केला जात नाही. तर, सांगली जिल्ह्यात १८ गावांसाठी १२ टॅंकर वापरण्यात येत आहेत. हिंगोलीमध्ये दोन गावांना एका टॅंकरने पाणी पुरवठा केला जात आहे. वाशिम जिल्ह्यातील आठ गावांसाठी टॅंकरचा वापर केला जात आहे. बुलढाण्यात फक्त चार गावांमध्ये पाणीटंचाई आहे. मात्र अन्य जिल्ह्यांमधील १६११ गावांना अजूनही १५२४ टॅंकरने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा लागत आहे.