तापमानात सतत होत असलेल्या चढउतारामुळे स्वाइन फ्लू पसरवणाऱ्या विषाणूंचा प्रभाव वाढत असून एकाच दिवसात १६ नवीन रुग्ण आढळल्याने धोक्याची घंटा वाजण्यास सुरुवात झाली आहे. हे सर्व रुग्ण पश्चिम उपनगरातील असून त्यात दहा वर्षांखालील सात मुले आहेत. दिलासा देणारी बाब म्हणजे १६ पैकी केवळ चौघांनाच रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासली आहे. शहरात आतापर्यंत स्वाइन फ्लूमुळे झालेल्या सहा मृत्यूत एकही मुंबईकर नसला तरी स्वाइन फ्लू रुग्णांची वाढती संख्या आरोग्य यंत्रणांसमोर आव्हान ठरेल.
शहरात उपचारांसाठी आलेल्या २९ जणांसह आतापर्यंतची स्वाइन फ्लू रुग्णांची संख्या ७६ वर  पोहोचली आहे. शहरातील ४७ रुग्णांपैकी १६ रुग्ण फक्त २४ तासांत सापडले आहेत. कांदिवली ते अंधेरी या भागात स्वाइन फ्लूची साथ अधिक दिसत असून लालबाग, महालक्ष्मी, मुंबई सेंट्रल या भागातही रुग्ण आढळले आहेत. रोगप्रतिकारकक्षमता कमी असलेल्या व्यक्तींमध्ये स्वाइन फ्लूचा संसर्ग होत असल्याचे गेल्या अनेक वर्षांत दिसून आले आहे. यावेळीही रुग्णांमध्ये लहान मुले व वृद्धांची संख्या अधिक आहे. या दहा वर्षांखाली सात मुलांची एकाच दिवसात नोंद झाली असून त्यापैकी दोन दहा महिन्यांची बालके अंधेरी व नागपाडा या भागातील आहेत.
दरम्यान मुंबईतील स्वाइन फ्लूच्या मृत्यूची संख्या सहावर गेली आहे. मात्र हे सर्व रुग्ण मुंबईबाहेरून उपचारासाठी आले होते. वापीवरून आलेल्या ४९ वर्षांच्या पुरुषाचा जसलोक रुग्णालयात मंगळवारी मृत्यू झाला. मुंबईतील १६ रुग्ण उपचारांसाठी रुग्णालयात दाखल असून त्यातील दोघांना कृत्रिम श्वसनयंत्रणेवर ठेवण्यात आले आहे.
स्वाइन फ्लूविषयीची जागृती, त्याच्या होणाऱ्या तपासण्यांमुळे रुग्णांची नेमकी संख्या दिसून येत आहे. मात्र आतापर्यंत शहरातील स्थिती पाहता या आजारामुळे गंभीर स्थिती निर्माण होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी आहे. बहुतेकांना औषधांसह घरीच उपचार करणे शक्य आहे, असे पालिकेच्या साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले. स्वाइन फ्लूवर उपचार होतात. तापाची लक्षणे आढळल्यास घाबरू नका, डॉक्टरांकडून उपचार करून घ्या, असा सल्ला त्यांनी दिला.

देशभरात २१६ मृत्यू
गेल्या दहा दिवसात देशभरात स्वाइन फ्लूमुळे २१६ मृत्यू झाले असून जानेवारीपासून मृतांचा आकडा ४०७ वर पोहोचल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले. गुजरात, राजस्थानमध्ये हा आजार मुख्यत्वे पसरला असून देशभरात ५,१५७ रुग्णांना संसर्ग झाला आहे. दिल्ली, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडू तसेच तेलंगणा येथेही रुग्ण आढळले असून महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान व तेलंगणा येथे मृत्यूंची संख्या अधिक आहे. या रुग्णांशी सतत संपर्क येत असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे आखण्यात येत आहेत. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून साठ हजार अधिक ओसेल्टामिव्हिर आणि दहा हजार एन-९५ मास्क मागवण्यात आले आहेत.

मुंबईतील एकूण रुग्ण – ४७
आतापर्यंत पूर्ण बरे झालेले – २०
पालिका व खासगी रुग्णालयात दाखल – १६
(त्यापैकी दोन कृत्रिम श्वसनयंत्रणेवर)
ओपीडी उपचार घेणारे – ११