जनुकीय रचना शोधण्यासाठी नमुने पुण्यातील एन.आय.व्ही संस्थेत

मुंबई : ब्रिटनमधून २५ नोव्हेंबरनंतर महाराष्ट्रात आलेल्या १६ नागरिकांना करोनाची बाधा झाल्याचे चाचणीअंती स्पष्ट झाले आहे. त्यात मुंबईतील तीन नागरिकांचा समावेश असून पुढील चाचणीसाठी त्यांचे नमुने पुणे येथे पाठविण्यात आल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.

ब्रिटनमध्ये करोनाच्या नव्या संकरावतारामुळे तेथून २५ नोव्हेंबर २०२० नंतर मुंबई आणि राज्यातील अन्य शहरांमध्ये आलेल्या नागरिकांचा शोध घेऊन त्यांच्या चाचण्या करण्यात येत आहेत. आतापर्यंत एक हजार १२२ प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली आहे. यापैकी काही जणांच्या चाचणीचे अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी १६ जणांना करोनाची बाधा झाल्याचे आढळले आहे. यात नागपूरमधील चार, मुंबई आणि ठाण्यातील प्रत्येकी तीन, पुणे येथील दोन, नांदेड, अहमदनगर, औरंगाबाद आणि रायगड येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

या करोनाबाधित रुग्णांचे नमुने जनुकीय रचना शोधण्यासाठी एन.आय.व्ही, पुणे येथे पाठविण्यात येणार आहेत. मुंबईतील रुग्णांचे नमुने पुणे येथे पाठविण्यात आल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली. या १६ नागरिकांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यात येत आहे. या बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या ७२ जणांचा शोध घेण्यात यंत्रणांना यश आले असून त्यापैकी दोघांना करोनाची बाधा झाल्याचे निदर्शनास आले आहे.

कल्याणमधील प्रवाशाला करोना

कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीत २५ नोव्हेंबरनंतर ब्रिटनमधून आलेल्या प्रवाशांची पालिकेने करोना चाचणी सुरू केली आहे. त्यात एक प्रवासी करोनाबाधित आढळून आला आहे. या प्रवाशाचा तपासणी अहवाल जनुकीय रचनेच्या तपासणीसाठी मुंबईतून पुणे येथील राष्ट्रीय संसर्गजन्य संस्थेकडे पाठविण्यात आला आहे. या प्रवाशाची प्रकृती स्थिर आहे, असे पालिका प्रशासनाने सांगितले.

२५ नोव्हेंबरनंतर सुमारे ५५ रुग्ण ब्रिटनमधून कल्याण-डोंबिवलीत आले आहेत. अशा प्रवाशांचा पालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून शोध घेऊन त्यांच्या करोना चाचण्या करण्यात येत आहेत. दोन दिवसात अशा २० जणांची करोना चाचणी करण्यात आली, असे साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील यांनी सांगितले. या प्रवाशामध्ये कोणतीही लक्षणे आढळून आलेली नाहीत. त्याची प्रकृती स्थिर आहे. त्याला विलगीकरणात ठेवण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले. या प्रवाशांच्या तपासणी अहवालात ब्रिटनमधील करोनाचा नवा प्रकार आढळून येतो की नाही, याची तपासणी पुण्यातील संस्थेमध्ये केली जाणार आहे.