News Flash

यंदा राज्यात १६ टक्के अधिक पाऊस

नंदुरबारमध्ये सरासरीपेक्षा कमी

(संग्रहित छायाचित्र)

कोकण, मराठवाडय़ात धो धो तर विदर्भ व धुळे, नंदुरबारमध्ये सरासरीपेक्षा कमी

यावर्षी देशभरात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याचा केंद्रीय वेधशाळेचा अंदाज पूर्णपणे खरा ठरला नसला तरी राज्यातील मुबलक पावसाची शक्यता मात्र वास्तवात उतरली. पावसाळ्याअखेर राज्यात पावसाने सरासरीपेक्षा १६ टक्के अधिक कामगिरी केली आहे. कोकण, मराठवाडा आणि प. महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पावसाने सरासरीपेक्षा २० ते ४० टक्के अधिक कामगिरी केली असून विदर्भात मात्र गडचिरोली व चंद्रपूर वगळता इतर जिल्ह्य़ात सरासरी व त्यापेक्षा कमी पाऊस पडला. पुढील दोन दिवस विदर्भ व मराठवाडय़ात पावसाच्या जोरदार सरी येण्याचा अंदाज असला तरी तांत्रिकदृष्टय़ा पावसाळ्याचे चार महिने शुक्रवारी संपले. आता त्यानुसार वर्षभराच्या पाण्याचे सरकारदरबारी नियोजन केले जाईल.

जास्त आणि कमी..

यावेळी देशभरात सरासरीपेक्षा १०६ टक्के अधिक पाऊस होईल, असा अंदाज केंद्रीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला होता. तांत्रिकदृष्टय़ा जून ते सप्टेंबर हा मोसमी वाऱ्यांचा काळ समजला जातो. त्यानुसार ३० सप्टेंबर अखेरीस देशभरात पावसाने सरासरीपेक्षा चार टक्के कमी कामगिरी केली आहे. राज्यात मात्र सरासरीपेक्षा १६ टक्के जास्त पाऊस झाला असून त्यात कोकणातील सर्वच जिल्ह्य़ात तर प. महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्य़ात  सरासरीपेक्षा १० ते ४० टक्के अधिक पाऊस पडला. प. महाराष्ट्रात धुळे व नंदुरबार या जिल्ह्य़ात मात्र यावर्षीही पावसाने ओढ दिली. या ठिकाणी सरासरीपेक्षा अनुक्रमे १९ व १५ टक्के कमी पाऊस पडला.

विदर्भात निराशा

विदर्भात गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत पावसाने चांगली कामगिरी केली असली तरी राज्याच्या इतर भागांच्या तुलनेत मात्र पावसाने विदर्भाची काहीशी निराशा केली आहे. भंडारा येथे २३ टक्के तर नागपूर येथे १५ टक्के कमी पाऊस पडला आहे. गडचिरोली व चंद्रपूर हे दोन जिल्हे वगळता पावसाने विदर्भात सरासरीएवढी किंवा त्यापेक्षा कमी हजेरी लावली आहे.

मराठवाडय़ात जोरदार

नेहमीच दुष्काळग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मराठवाडय़ात यावेळी पावसाची कृपादृष्टी झाली. कोकण व प. महाराष्ट्राच्या तुलनेत या ठिकाणी पावसाचे प्रमाण कमी असले तरी वर्षांनुवर्षांच्या सरासरीच्या तुलनेत मात्र मराठवाडय़ातील सर्वच जिल्ह्य़ांना पावसाचा दिलासा मिळाला आहे. लातूरमध्ये सरासरीपेक्षा तब्बल ३५ टक्के अधिक पाऊस झाला असून उस्मानाबाद, बीड, जालना, परभणी, नांदेड याठिकाणीही १२० टक्क्य़ांपेक्षा अधिक पाऊस पडला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 1, 2016 1:02 am

Web Title: 16 percent more rainfall in maharashtra
Next Stories
1 सेवाव्रतींच्या कार्याला दाद
2 ‘झोपु’ प्राधिकरणाला गृहप्राधिकरणाचा धक्का !
3 किनाऱ्यालगतचे ‘टेट्रापॉड’ हलविणार
Just Now!
X