दोन फेऱ्यांत प्राधान्यक्रमाने महाविद्यालय मिळूनही प्रवेश न घेतल्याचा परिणाम

मुंबई : अकरावीच्या पहिल्या आणि दुसऱ्या फेरीत पहिल्या प्राधान्यक्रमाचे महाविद्यालय मिळूनही प्रवेश न घेतल्यामुळे १६ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेतून वगळण्यात आले आहे. तिसऱ्या फेरीत महाविद्यालयाच्या प्राधान्यक्रमामध्ये सोमवारी सायंकाळपर्यंत बदल करता येणार आहेत.

अकरावीच्या पहिली प्रवेश फेरी, दुसरी प्रवेश फेरी आणि द्विलक्ष्यी अभ्यासक्रमाचे प्रवेश मिळून जवळपास ९५ हजार ५२६ विद्यार्थ्यांनी आतापर्यंत महाविद्यालयांमध्ये प्रवेश निश्चित केला आहे.

अकरावीच्या पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये पहिल्या प्राधान्य क्रमाचे महाविद्यालय मिळूनही प्रवेश न घेतल्यामुळे १६ हजार ३४४ विद्यार्थ्यांना केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतून बाहेर पडावे लागले आहे.

पहिल्या फेरीत ४८ हजार ८७२ विद्यार्थ्यांना प्रथम प्राधान्यक्रमाचे महाविद्यालय मिळाले होते. त्यापैकी ३६ हजार ७७० विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतला. दुसऱ्या फेरीत १६ हजार ३३६ विद्यार्थ्यांना प्रथम प्राधान्यक्रमाचे महाविद्यालय मिळाले होते त्यातील १२ हजार ९४ विद्यार्थ्यांनीच प्रवेश निश्चित केला.

प्रथम प्राधान्यक्रमाचे महाविद्यालय मिळूनही प्रवेश न घेतलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी अल्पसंख्याक, व्यवस्थापन कोटय़ातूनही प्रवेश निश्चित केले आहेत. आतापर्यंत ३५ हजार ७८४ विद्यार्थ्यांचे प्रवेश विविध कोटय़ांतून झालेआहेत. तिसऱ्या फेरीसाठी १ लाख ८ हजार २१७ जागांवर प्रवेश होणार असून साधारण ८० ते ९० हजार विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. मंगळवारी (३० जुलै) तिसरी प्रवेश यादी जाहीर होणार आहे.

आतापर्यंत झालेले प्रवेश

’ पहिली फेरी – ६१ हजार ६९१

’ दुसरी फेरी – २७ हजार ४५१

’ द्विलक्ष्यी अभ्यासक्रम – ६ हजार ३८४

’ संस्थांतर्गत – ८ हजार ११४

’ अल्पसंख्याक – २४ हजार ९०६

’ व्यवस्थापन – २ हजार ७६४