मुंबईतील ताडदेव भागात इम्पेरियल टॉवर या इमारतीवरुन पडून एका तरुणीचा मृत्यू झाला आहे. २३ मजल्यांच्या या इमारतीवरुन ही तरुणी पडली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. आता तिने उडी मारुन आत्महत्या केली की अपघाताने ती पडली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मुंबई सेंट्रल येथील ताडदेव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास सुरु असल्याचे सांगण्यात आले आहे. प्रियांका कोठारी असे या तरुणीचे नाव असून तिचे वय १६ वर्षे असल्याचे समजले आहे. इमारतीचा सुरक्षारक्षक रात्री राऊंड मारत असताना रात्री २ वाजता त्याला नवव्या मजल्यावरील लॉनमध्ये एक मृतदेह दिसला. त्याने लगेच ही घटना सोसायटीतील संबंधित यंत्रणेला कळवली. मग पोलिसांना बोलावण्यात आले आणि हा मृतदेह नायर हॉस्पिटलला नेण्यात आला अशी माहिती पोलिसांनी दिली.

या इमारतीचे पहिले ८ मजले पार्कींग असून ९ व्या मजल्यापासून घरे आहेत. आपण या मुलीला ओळखत नसल्याचे सुरक्षारक्षकाचे म्हणणे आहे. बरीच चौकशी केल्यानंतर मृत्यू झालेली प्रियांका २३ व्या मजल्यावर राहत असल्याचे स्पष्ट झाले. या मुलीचे वडिल अमरीश कोठारी यांचा दागिन्यांचा व्यवसाय असून काही कामासाठी ते शुक्रवारी बाहेरगावी गेले होते. ही घटना समजल्यानंतर ते त्वरीत मुंबईत दाखल झाले. प्रियांका हीचा मोबाईल सापडत नसल्याचेही पोलिसांच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. प्रियांका रात्री ११.४५ वाजता घरी आली होती. त्यावेळी तिच्या घरात राहणाऱ्या कामवाल्या बाईने दार उघडले होते. मात्र त्यानंतर ही महिला झोपायला गेली असेही पोलिसांनी सांगितले. या इमारतीतील बाल्कनींना ग्रील नसल्याचेही पोलिसांनी म्हटले आहे.

आतापर्यंत कोणतीही सुसाईड नोट सापडली नसल्याने तिचा मृत्यू नेमका कसा झाला हे सांगता येत नाही. पोलिस इमारतीतील सीसीटीव्ही फुटेजचा तपास करत आहेत. मात्र एकाएकी तिचा मृतदेह सापडल्याने तिच्या नातेवाईकांना चांगलाच धक्का बसला आहे. ती मृत झाल्याचे घोषित केल्यानंतर तिचा मृतदेह रुग्णालयातून घरी आणण्यात आला. कोठारी यांच्या घराच्या हॉलमध्येही सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. मात्र तिचे कुटुंबिय आता धक्क्यातून सावरलेले नसल्याने काही काळाने त्यांना याबाबत विचारणा करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले.