संदीप आचार्य 
मुंबई: मुंबईच्या आरोग्य सेवेचाव कणा मानल्या जाणार्या मुंबई महापालिकेच्या परळ येथील केईएम रुग्णालयातील पाच डॉक्टरांसह १७ जणांना करोनाची लागण झाली असून तब्बल ३०० जणांना विलगीकरणाखाली ( क्वारंटाइन) ठेवण्यात आले आहे.

केईएम रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभागात तसेच करोना झाल्याच्या संशयापोटीही अनेक लोक येत असतात.या सर्वांचीच योग्य तपासणी करून त्यानुसार उपचार केले जातात. येथे करोनासाठी अतिदक्षता विभागात ७५ खाटांची व्यवस्था करण्यात आली असून करोना संशयित रुग्ण, ज्यांची करोना चाचणी नकारात्मक आली व जे रुग्ण करोना बाधित आहेत अशी वर्गवारी करण्यात आली आहे.

दररोज येथे मोठ्या प्रमाणात रुग्ण येत असून त्यातूनच डॉक्टर व अन्य कर्मचाऱ्यांना लागण झाल्याचे येथील निवासी डॉक्टरांचे म्हणणे आहे. आम्हाला जरी प्रशासनाकडून करोना संरक्षित पोषाख देण्यात येत असला तरी दिवसाकाठी केवळ एकच पोषाख मिळत असल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचेही काही डॉक्टरांनी नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले. तपासणीसाठी रुग्णांचा येणारा ओघामुळेच आमच्या पाच डॉक्टर व परिचारिकांसह १७ जणांना करोनाची लागण झाली असून सुमारे ३०० जण आज क्वारंटाईन म्हणजे विलगीकरणाखाली आहेत, असेही या डॉक्टरांनी सांगितले.

आज केईएमसह पालिकेच्या बहुतेक रुग्णालयात करोनाचा सामना आघाडीवर राहून लढत आहेत ते निवासी डॉक्टर. अशावेळी आमचे सहयोगी प्राध्यापक व प्राध्यापकमंडळी कुठे आहेत असा सवालही काही डॉक्टरांनी केला. पालिका मुख्यालयात आयुक्तांसह एकूण नऊ आयएनएस अधिकारी असून हे ‘बाबू’ लोक आम्ही कोणत्या परिस्थितीत काम करत आहोत हे पाहाण्यासाठी का येत नाहीत, असा रोखठोक सवालही त्यांनी केला. एरवी उठता बसता ‘आपल्या रुग्णासाठी’ फोन करणारी नेतेमंडळी आज डॉक्टरांना काही मदत हवी का, असे का विचारत नाहीत असा मुद्दाही एका ज्येष्ठ डॉक्टरांनी मांडला.

केईएमचे माजी अधिष्ठाता व मुंबईच्या आरोग्य सेवेच्या बळकटीकरणासाठी शासनाने नियुक्त केलेल्या समितीचे अध्यक्ष डॉ संजय ओक यांना विचारले असता सर्जरी, अॅनाटॉमी, पीएसएमसह अन्य विभागाच्या डॉक्टरांनी आता पुढे येण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. केईएमचे अधिष्ठाता डॉ हेमंत देशमुख म्हणाले, “करोनाची लढाई ही लगेच संपणारी नाही. यामुळे राखीव फौजेची व्यवस्था करावी लागले. नेमके तेच आम्ही केले आहे. मेडिसिन, टेस्ट मेडिसिन तसेच तेथील निवासी डॉक्टर आज लढाईत आघाडीवर आहेत. आगामी काळात करोनाचे रुग्ण वाढतील हे गृहित धरून न्युरोसर्जरी, नेफ्रॉलॉजी, पीएसएम, अॅनाटॉमी, सर्जरीसह वेगवेगळ्या विभागातील डॉक्टरांनाही काम करावे लागणार आहे. यासाठी त्यांनाही करोनाचा सामना कसा करायचा याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे.”

“येथील पाच डॉक्टरांसह १७ जणांना करोनाची लागण झाली हे खरे असून ३०० मार्चपासून क्वारंटाइनखाली आहेत. सहाय्यक पालिका आयुक्त व आरोग्य विभागाच्या माध्यमातून या सर्वांची स्थानिक हॉटेलहॉटेल व अन्य ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. विलगीकरणाखालील हे कर्मचारी येत्या २८ एप्रिलपर्यंत कामावर येतील”, असा विश्वास डॉ देशमुख यांनी व्यक्त केला. केईएमध्ये नियमित शस्त्रक्रिया जवळपास बंद असल्याबाबत विचारले असता डॉ हेमंत देशमुख म्हणाले, “१८०० खाटांच्या केईएम रुग्णालयात एरवी सहा हजार ते आठ हजार रुग्ण बाह्य रुग्ण विभागात उपचारासाठी येतात तर सुमारे २५० शस्त्रक्रिया दररोज केल्या जातात. आम्ही नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या आहेत मात्र अत्यावश्यक शस्त्रक्रिया आम्ही करतो. हे प्रमाण साधारणपणे दहा टक्के म्हणाजे रोज २५ ते ३० शस्त्रक्रिया आम्ही करतो. तसेच बाह्यरुग्ण विभागातही येणाऱ्यांची संख्या सध्या कमी झाली आहे. करोनाच्या लढाईवर सध्या आमचे पूर्ण लक्ष केंद्रित असून आमचे डॉक्टर त्यासाठी जीवाचे रान करत आहेत” असेही डॉ देशमुख यांनी आवर्जून सांगितले.