मध्य रेल्वेवर १५, पश्चिम रेल्वेवर दोघांचा मृत्यू

मध्य रेल्वेने केलेल्या विविध उपाययोजनांमुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा रेल्वेमार्गावर होणाऱ्या अपघाती मृत्यूंची संख्या कमी झाल्याचा दावा गुरुवारी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक करत असतानाच त्याच दिवशी उपनगरीय रेल्वेमार्गावर १७ बळी गेले आहेत. त्यापैकी अंधेरी आणि वसई रोड लोहमार्ग पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील एक-एक मृत्यू वगळता उर्वरित १५ अपघाती मृत्यू मध्य रेल्वेच्या हद्दीतच झाले आहेत. त्यामुळे आठ महिन्यांच्या आकडेवारीचा आधार घेत केलेला महाव्यवस्थापकांचा दावा पोकळ असल्याचे लक्षात येत आहे.

mv05ही माहिती महाव्यवस्थापक सादर करत असतानाच गुरुवारच्या दिवसभरात मुंबईच्या उपनगरीय मार्गावर एकूण १७ मृत्यू झाल्याचे लोहमार्ग पोलिसांच्या आकडेवारीनुसार स्पष्ट होत आहे. या १७ पैकी १५ जणांचा मृत्यू मध्य रेल्वेच्या हद्दीतच झाला आहे. तसेच गेल्या काही दिवसांच्या अपघातांच्या आकडेवारीवर नजर टाकली असता बुधवारी १४ पैकी ९, मंगळवारी नऊपैकी पाच, सोमवारी १२ पैकी सात, रविवारी नऊपैकी सहा, शनिवारी आठपैकी सहा असे मृत्यू मध्य रेल्वेवरच झाले आहेत.

महाव्यवस्थापकांच्या दाव्यातील विसंगती

गुरुवारी प्रेस क्लबमध्ये मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अखिल अग्रवाल यांच्यासह ‘मुक्त संवादा’चा कार्यक्रम पत्रकारांसाठी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमादरम्यान पत्रकारांनी रेल्वेच्या अपघाती मृत्यूंबाबत प्रश्न विचारले. त्या वेळी हे अपघात कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने अनेक उपाययोजना केल्याचे महाव्यवस्थापक अग्रवाल यांनी स्पष्ट केले. त्यात सरकते जिने, पादचारी पूल, रेल्वेमार्गाच्या बाजूला कुंपण आदी गोष्टींचा समावेश असल्याचेही त्यांनी सांगितले. या उपायांमुळे २०१५च्या तुलनेत २०१६मध्ये मध्य रेल्वेवरील अपघाती मृत्यूंची संख्या कमी झाल्याचा दावाही त्यांनी केला. २०१५मध्ये मध्य रेल्वेवर एकूण २१८७ मृत्यू झाले होते. तर यंदा ऑगस्ट महिन्यापर्यंत मध्य रेल्वेवर १४१४ मृत्यू झाले आहेत. ही संख्या कमी असून त्यानंतरही अपघातांचा आलेख उतरता असल्याचे सांगितले.