पालिका विभागांतील स्थिती; सर्वाधिक बालमृत्यूंची नोंद मुंबईत

मुंबई महानगर प्रदेशात बालमृत्यूमध्ये घट झाल्याचा दावा पालिकेकडून केला जात असला तरी त्यात गेल्या वर्षांच्या तुलनेत वाढ झाली आहे. सर्वाधिक बालमृत्यूंची नोंद मुंबई पालिका विभागात झाली असून पाच वर्षांखालील बालमृत्यूच्या आकडेवारीतही हेच चित्र निदर्शनास येत आहे. राज्यात मात्र बालमृत्यूंमध्ये किंचित घट झाल्याची नोंद आहे.

राज्यातील ग्रामीण क्षेत्रामध्ये बालकांच्या आरोग्य सुविधांवर भर दिला जात असून बालमृत्यू कमी करण्यात काही अंशी यश मिळाले असल्याचे फेब्रुवारी २०१७ ते २०१९ च्या आरोग्य माहिती व्यवस्थापन प्रणालीच्या आकडेवारीतून स्पष्ट होते.

बालमृत्यू अधिक असलेल्या आदिवासीबहुल भागातील पालघरमध्ये एक वर्षांखालील बालमृत्यूचे प्रमाण ४२ टक्क्यांनी तर पाच वर्षांखालील बालमृत्यू जवळपास ६० टक्क्यांनी घटले. नाशिक, गडचिरोली, अमरावती भागात एक वर्षांखालील बालकाच्या मृत्यूचे प्रमाण घटल्याचे आश्वासक चित्र असले तरी ठाणे, नंदुरबार येथे मात्र हे प्रमाण दखल घेण्याइतपत वाढले आहे.

जळगावमध्ये एक वर्षांखालील बालमृत्यूंमध्ये ६० टक्क्यांनी घट झाली आहे. पालिका विभागात सर्वाधिक बालमृत्यू मुंबईत नोंद झाले असून बालमृत्यूंमध्ये २०१८ च्या तुलनेत पाच टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याबरोबरच ठाणे, मीरा-भाईंदर, कल्याण, डोंबिवली, भिवंडी या भागांतही बालमृत्यूचे प्रमाण वाढले आहे.

मुंबईखालोखाल सांगली, औरंगाबाद, अकोला, धुळे, कोल्हापूर शहरांमध्ये बालमृत्यू वाढले आहेत. आरटीआय कार्यकर्ते चेतन कोठारी यांना माहिती अधिकारातून माहिती प्राप्त झाली आहे.

पालिका विभागांमध्ये गेल्या वर्षी योग्य नोंदणीसाठी प्रशिक्षण दिले असल्याने नोंदणी प्रक्रिया अधिक सक्षम झाल्याने आकडेवारी वाढल्याचे दिसून येते. तसेच गंभीर अवस्थेतील बालके पुढील उपचारांसाठी पालिका रुग्णालयांत पाठविली जातात. ही बालके बाहेरील जिल्हा रुग्णालयांतून आली असली तरी यांच्या मृत्यूची नोंद पालिका रुग्णालयात केली जाते, त्यामुळेदेखील या रुग्णालयात बालमृत्यूंचे प्रमाण तुलनेने अधिक असल्याचे दिसते.

-डॉ. अर्चना पाटील, प्रभारी आरोग्य संचालक