21 August 2019

News Flash

उत्साहाचा उच्चांक!

या प्राथमिक फेरीत एकूण १७ एकांकिका सादर झाल्या.

लोकसत्ता लोकांकिकेच्या मुंबई विभागीय प्राथमिक फेरीत १७ एकांकिका सादर
‘लोकसत्ता लोकांकिका’स्पर्धेच्या रविवारी मुंबईत प्रभादेवी येथे झालेल्या मुंबई विभागाच्या प्राथमिक फेरीतून मुंबई विभागीय अंतिम फेरीसाठी पाच एकांकिकांची निवड करण्यात आली. यात ‘एक्स-प्रीमेंट’- म. ल. डहाणूकर महाविद्यालय (लेखक भावेश सुर्वे, दिग्दर्शक-भावेश सुर्वे, कुणाल शुक्ल), ‘सुशेगात’-रुईया महाविद्यालय (लेखक व दिग्दर्शक अभिजीत खाडे), ‘अर्बन’-साठय़े महाविद्यालय (लेखक व दिग्दर्शक ऋषिकेश कोळी), ‘लछमी’-किर्ती महाविद्यालय (लेखक- संचित वर्तक व दिग्दर्शक-संतोष माईणकर), ‘शिकस्ते इश्क’-के. जे. सोमय्या महाविद्यालय (लेखक व दिग्दर्शक सिद्धार्थ साळवी) यांचा समावेश आहे.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमधील नाटय़कलेच्या जोपासनेसाठी आणि त्यांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ‘लोकसत्ता’ने सुरू केलेल्या ‘लोकांकिका’स्पर्धेतील मुंबई विभागीय प्राथमिक फेरी रविवारी प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़ मंदिर, पु. ल. देशपांडे कला अकादमीत रंगली. या प्राथमिक फेरीत एकूण १७ एकांकिका सादर झाल्या. या एकांकिकांमध्ये विविध विषय हाताळण्यात आले होते. मुस्लिम धर्मातील ‘इद्दत’ रुढी, आजच्या काळात महात्मा गांधी अवतरले तर ते विद्यमान सत्ताधारी आणि विरोधी पक्षानाही कसे नकोसे होतील हे वास्तव, चर्चचा आणि चर्चमधील ‘फादर’ यांचा समाजावर असलेला पगडा, त्यांच्याकडून समाजाचे होणारे शोषण, कुत्रा चावल्यानंतर रेबीजच्या इंजेक्शनचा शोध लावणो लुई पाश्चर अशा विविध विषयांवरील एकांकिका विद्यार्थ्यांनी व्यावसायिक नाटकांच्या सफाईने सादर केल्या.
‘सॉफ्ट कॉर्नर’ प्रस्तुत आणि ‘पृथ्वी एडिफिस’ यांच्या सहकार्याने झालेल्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ या स्पध्रेसाठी रेडिओ पार्टनर म्हणून ‘९३.५ रेड एफएम’चे आणि टेलिव्हिजन पार्टनर म्हणून ‘झी मराठी नक्षत्र’चे सहाय्य लाभले आहे. ही स्पर्धा ‘अस्तित्त्व’ या संस्थेच्या मदतीने राज्यभरातील आठ केंद्रांवर होत आहे. तसेच स्पध्रेतील प्रतिभावान कलाकारांची निवड करण्यासाठी ‘आयरिस प्रॉडक्शन’ हे टॅलेण्ट पार्टनर, तर ‘स्टडी सर्कल’ हे नॉलेज पार्टनर म्हणून सहभागी होणार आहेत. प्रभादेवी येथे झालेल्या प्राथमिक फेरीसाठी हेमंत लब्धे, गिरीश पतके, राजीव जोशी, अभिजित झुंजारराव यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. तर सुवर्णा राणे व रागिणी चुरी या ‘आयरिस प्रॉडक्शन’च्या प्रतिनिधी म्हणून उपस्थित होत्या.

First Published on October 5, 2015 5:27 am

Web Title: 17 plays presents in mumbai division
टॅग Lokankika,Mumbai