संदीप आचार्य

राज्यात करोनाचा सामना करण्यासाठी आरोग्य विभागाची संपूर्ण यंत्रणा अहोरात्र झटत असली तरी या यंत्रणेत डॉक्टरांसह मनुष्यबळाचा तुटवडा मोठा आहे. आरोग्य संचालक, अतिरिक्त संचालक, सहसंचालक, उपसंचालकांसह आरोग्य विभागात डॉक्टरांसह तब्बल १७,००५ पदे रिक्त आहेत.

यात आरोग्य संचालकांपासून वैद्यकीय अधिकाऱ्यांपर्यंत २५२२ पदे भरण्यात आलेली नाहीत. याशिवाय विशेषज्ञांची तब्बल ४९३ पदे रिक्त आहेत. ही पदे लवकरच भरण्यात येतील अशी आश्वासने वर्षांनुवर्षे अधिवेशन काळात आरोग्यमंत्र्यांकडून देण्यात येत असली तरी प्रत्यक्षात त्यासाठी कोणतीही ठोस पावले आजपर्यंत उचलण्यात आलेली नाहीत.

राज्याच्या आरोग्य विभागाचा पसारा मोठा असून आरोग्य खात्याची ५०८ रुग्णालये आहेत. याशिवाय ग्रामीण व दुर्गम भागातील आरोग्याची काळजी घेण्यासाठी १८२८ प्राथमिक आरोग्य केंद्रे तर १०,६६८ उपकेंद्रे आहेत. यात आरोग्य संचालकांच्या दोन पदांपैकी एक पद रिक्त आहे. अतिरिक्त संचालकांच्या तीन पदांपैकी २ पदे रिक्त आहेत तर सहसंचालकांच्या १० पदांपैकी ८ पदे भरण्यात आलेली नाहीत. गंभीर बाब म्हणजे काही वर्षांपूर्वी सहसंचालक साथरोग हे पद रद्द करून त्याऐवजी सहसंचालक खरेदी असे पद निर्माण करण्यात आल्याचा मोठा फटका आज करोनाच्या पार्श्वभूमीवर बसत आहे. पुणे येथील हंगामी आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील यांनाच आज संचालक, अतिरिक्त संचालक व सहसंचालकांची भूमिका बजवावी लागत आहे.

डॉक्टरांची तसेच विशेषज्ञांची हंगामी पदे भरण्यासाठी वेळोवेळी जाहिरात देऊनही डॉक्टर मिळत नाहीत. यामागे ग्रामीण वा दुर्गम भागात डॉक्टरांना पुरेसे मानधन मिळत नसल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांचे म्हणणे आहे.

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या २८१ मंजूर पदांपैकी १५७ पदे रिक्त आहेत तर जिल्हा शल्य चिकित्सकांच्या ६४३ पदांपैकी ३६८ पदे भरण्यातच आलेली नाहीत. बालरोगतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, अस्थीरोग आदी विशेषज्ञांची ६२७ पदे मंजूर असली तरी त्यातील ४९३ पदे आजघडीला रिक्त आहेत. परिचारिकांची ३० टक्के तसेच आरोग्य सेविका व साहाय्यकांची ५० टक्के पदे रिक्त असल्याचे आरोग्य विभागाच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

आरोग्य विभागातील विशेषज्ञांची सर्व पदे येत्या तीन महिन्यांत कोणत्याही परिस्थितीत भरण्यात येतील. १७ हजार पदे रिक्त असून यापूर्वी पदे का भरण्यात आली नाही याची मला कल्पना नाही. सर्व पदे आरोग्य खात्यामधूनच भरण्याबाबत आपण मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरवा करू. आरोग्य खात्याला अधिक निधी मिळाला पाहिजे व सध्याची परिस्थिती लक्षात घेता आगामी काळात आरोग्याला चांगला निधी मिळवून देईन.

– राजेश टोपे, आरोग्यमंत्री