फेब्रुवारी २०१७ मध्ये होऊ घातलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी अनुसूचित जाती आणि जमातींकरिता १७ प्रभाग राखून ठेवण्यात येणार असून गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा अनुसूचित जाती व जमातींसाठी अधिक चार प्रभाग उपलब्ध करण्यात येणार आहेत. परिणामी, अन्य नगरसेवकांचे चार प्रभाग कमी होण्याची चिन्हे आहेत.

मुंबई महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी २०१७ मध्ये होऊ घातली आहे. या निवडणुकीसाठी प्रभागांची फेररचना करण्यात आली असून  आरक्षणाची सोडत ३ ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे. तत्पूर्वीच अनुसूचित जाती आणि जमातीसाठी आरक्षित असेलेल्या प्रभागांची संख्या निश्चित करण्यात आली आहे. मागील म्हणजे २०१२ मध्ये झालेल्या पालिकेच्या निवडणुकीमध्ये अनुसूचित जातीसाठी ११ आणि अनुसूचित जमातीसाठी दोन प्रभाग राखून ठेवण्यात आले होते. यावेळी या आरक्षणासाठी प्रभाग संख्या १७ करण्यात आली आहे.

अनुसूचित जातींसाठी प्रभाग क्रमांक २६, ५३, ९३, १२१, १४२, १४६, १५२, १५५, १६९, १७३, १९५, १९८, २००, २१० आणि २५५, तर अनुसूचित जमातींसाठी प्रभाग क्रमांक ५९ व ९९ आरक्षित करण्यात आले आहेत. या प्रभागांची अधिकृत घोषणा ३ ऑक्टोबर रोजी करण्यात येणार आहे.