श्वान, मांजरींसोबत पक्ष्यांनाही नागरिकांकडून इजा

मुलुंड आणि ठाण्यात बेदरकारपणे वाहन चालवून श्वानांना जिवानिशी मारण्यात आल्याच्या घटना ताज्या असतानाच गेल्या दीड वर्षांत एकूणच भटक्या जनावरांवर नागरिकांकडून होणाऱ्या हल्ल्यांच्या घटनांत बेसुमार वाढ झाल्याचे समोर येत आहे. गेल्या दीड वर्षांत अशा हल्ल्यांमध्ये मृत्यू पावलेल्या किंवा अपंगत्व आलेल्या प्राण्यांची संख्या १७२१ असल्याचे उघड झाले आहे. अशा प्रकरणांतील ६०० हून अधिक तक्रारी पोलीस ठाण्यांत दाखल करण्यात आल्या असल्या तरी आतापर्यंत एकाही आरोपीला शिक्षा झाली नसल्याचा प्राणीप्रेमींचा आरोप आहे.

‘प्राणी हल्ला प्रतिबंधक कायद्या’नुसार प्राण्यांवर हल्ला करणाऱ्यावर २०० रुपये ते १००० रुपये दंड आकारला जातो. ही रक्कम खूप कमी आहे. यामुळे समाजात या कायद्याविषयी भीती नसल्याने प्राण्यांना दुखापत करणे शुल्लक मानले जाते, असे ‘साखरा बाई दिनशॉ पेटीट रुग्णालया’चे प्रमुख डॉ. जे. सी. खन्ना यांनी सांगितले. मानवी हल्ल्यांत जखमी होऊन या रुग्णालयात दाखल झालेल्या प्राण्यांची वर्षभरातील संख्या १२०० च्या आसपास आहे. तर मुंबईतील ‘पावा’ (पीस फॉर अ‍ॅनिमल वेल्फेअर असोसिएशन) या संस्थेने गेल्या वर्षभरात प्राण्यांवर हल्ला करणाऱ्या ३५० जणांविरोधात गुन्हा नोंदविला आहे. ठाण्यातील ‘पॉज’ (प्लांट अ‍ॅण्ड अ‍ॅनिमल वेल्फेअर) या संघटनेने तर गेल्या वर्षभरात १७१ जणांवर गुन्हा नोंदविला आहे. ही आकडेवारी गेल्या वर्षांच्या तुलनेत अधिक आहे, असे या संघटनेचे संस्थापक नीलेश भणगे यांनी सांगितले. आपल्याकडे भारतीय दंड विधानाअंतर्गत प्राण्यांवरील हल्ले रोखण्यासाठी ४२९ हे कलम असताना आतापर्यंत एकही गुन्हेगाराला शिक्षा झालेली नाही. प्राण्यांवरील हल्ल्याच्या अधिकतर घटना या मोठ-मोठय़ा सोसायटींमध्ये घडतात, असे ‘पावा’ या संघटनेचे संस्थापक सलीम चारानिया यांचे म्हणणे आहे. या हल्ल्यात ठाण्यातील हिरानंदानी, लोखंडवाला, मीरा रोड येथील कलपुत्र सोसायटी अशा मोठय़ा सोसायटय़ांचा समावेश आहे.

गाडीखाली चिरडून मारणे, रस्त्यावर झोपलेल्या श्वानाला बॅट किंवा तत्सम वस्तूने मारणे, प्राण्यांच्या अंगावर रासायनिक द्रव्य किंवा अ‍ॅसिड टाकणे यांसारख्या अनेक घटना मुंबई आणि उपनगरातील पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आल्या आहेत.

काही दिवसांपूर्वी अंधेरीतील जेएलएल या नामांकित कंपनीतील दोन कर्मचाऱ्यांनी भटक्या कुत्र्यांना दोन दिवस अंधाऱ्या खोलीत डांबून ठेवले होते. या घटनेनंतर त्यांना कामावरून काढून टाकण्यात आले होते. मात्र अशा अनेक घटनांविरोधात तक्रार दाखल करूनही गुन्हेगारांना शिक्षा होत नाही. भारतीय दंड विधानाअंतर्गत भटक्या प्राण्यांना त्रास देणाऱ्या किंवा त्यांची हत्या करणाऱ्यांवर ४२९ कलमाअंतर्गत ५ वर्षांची शिक्षा ठोठावण्यात येते. अपघातात प्राण्याला दुखापत झाल्यास आरोपीवर २७९ हे कलमही लावण्यात येते. यातून त्याची शिक्षा दुप्पट होते.

दोन फ्लेमिंगोही जखमी

भटक्या प्राण्यांबरोबर पक्ष्यांनाही माणसांच्या हल्ल्याला सामोरे जावे लागत आहे. दोन दिवसांपूर्वी माझगाव व नवी मुंबई येथील दोन जखमी फ्लेमिंगो ‘साखरा बाई दिनशॉ पेटीट रुग्णालयात’ दाखल करण्यात आले आहेत. यातील एका फ्लेमिंगोला दगडाने मारले असून त्यात त्याचा पाय निकामी झाला आहे, तर दुसराही जबर जखमी आहे.