मुंबईतल्या मालाड भागात १९ मजुरांचा मृत्यू झाला, तर १० पेक्षा जास्त मजूर जखमी झाले. या मृत्यूंना महापालिका जबाबदार आहे असा आरोप विरोधकांनी केला आहे. मात्र शिवसेना खासदार संजय राऊत यांनी हा आरोप खोडून काढला आहे. १९ मजुरांच्या मृत्यूला मुंबई महापालिका नाही तर पाऊस जबाबदार आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. मालाडमध्ये जी घटना घडली तो एक अपघात आहे. पाऊसच इतक्या प्रमाणात झाला की हा अपघात घडला. मुंबईत अनेक बेकायदा बांधकामं सुरू आहेत मात्र मुंबई महापालिकेचा त्याच्याशी संबंध नाही असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

एवढंच नाही तर काही वेळापूर्वीच त्यांनी एक कविताही ट्विट केली आहे. ज्यामध्ये त्यांनी पावसाचं वर्णन केलं आहे. दरम्यान विधानसभेतही संजय राऊत यांनी जो मुद्दा उपस्थित केला त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विरोधकांनी प्रश्न विचारला. वारीस पठाण यांनीही हा मुद्दा उपस्थित केला.  ज्यावर आपण योग्य ती कारवाई करू असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

मालाडमध्ये रात्री १ ते २ च्या सुमारास भिंत कोसळून १९ जणांचा मृत्यू झाला. यानंतर महापालिका आणि प्रशासन यांना प्रश्न विचारले जात आहेत. तसंच महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप होतो आहे. मात्र विरोधकांचा हा आरोप संजय राऊत यांनी खोडून काढला आहे.