संदीप आचार्य 
मुंबई: लॉकडाउन व करोनाच्या काळात मंदिरातील देव बंदीस्त होते. अगदी तिरुपती बालाजीपासून सगळेच देव कड्या-कुलुपात बंद असताना डॉक्टररुपी अश्विनीकुमार मात्र अहोरात्र करोना रुग्णांवर उपचार करत होते. मात्र या करोनाच्या लढाईत महाराष्ट्रात देवरुपी तब्बल १८ डॉक्टर रुग्णसेवा करताना शहीद झाले तर १२०० हून अधिक डॉक्टरांना करोनाबाधित झाले होते. याशिवाय जवळपास दोन हजारच्या आसपास डॉक्टरांना क्वारंटाइन व्हावे लागले.

“१ जुलै हा ‘डॉक्टर्स डे’ म्हणून साजरा केला जात असून जगभरातील डॉक्टरांना यंदाचा ‘डॉक्टर्स डे’ करोनामुळे कायम लक्षात राहील. एकट्या महाराष्ट्रात आज १ लाख ७० हजार रुग्ण करोनाबाधित आहेत तर ७६१० हून अधिक करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनाच्या या लढाईत जमेची बाजू म्हणजे जवळपास नव्वद हजार रुग्ण म्हणजे ५२ टक्के रुग्ण बरेही झाले आहेत. यामागे डॉक्टरांचे अथक परिश्रम कारणीभूत असून यंदाचा ‘डॉक्टर्स डे’ हा केवळ डॉक्टरांच्याच नव्हे तर प्रत्येकाच्या कायम लक्षात राहील”, असे नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी सांगितले.

“देवळातील देव आज कड्याकुलपात बंदीस्त असताना आमचे डॉक्टर ‘देवरुपाने’ पीपीइ किट घालून रुग्णसेवा करत असल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत असल्या”चे डॉ. मोहन जोशी म्हणाले. मुंबईत महापालिका रुग्णालयांनी व आमच्या डॉक्टरांनी केलेला करोनाचा सामना हा असाधारण आहे. “या लढाईत निवासी डॉक्टरांची भूमिका कौतुकास्पद असून तेच आमचे खरे हिरो असल्या”चे केईएमचे माजी अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले. महापालिकेतील सर्वच डॉक्टर जीवाची बाजी लावून रुग्णसेवा करत असल्याचे डॉ. अविनाश सुपे म्हणाले. महापालिकेचे डॉक्टर व मोठ्या संख्येने आरोग्य कर्मचारी या लढाईत करोनाबाधित झाले तसेच अनेकांना क्वारंटाइन व्हावे लागले.

“महापालिकेतील जवळपास ३०० हून अधिक डॉक्टरांना करोनाची लागण झाली किंवा क्वारंटाईन व्हावे लागल्या”चे डॉ. मोहन जोशी यांनी सांगितले. “खरेतर किती डॉक्टर व आरोग्य कर्मचारी या लढाईत जखमी झाले याचा हिशेब ठेवण्यासाठी आमच्याकडे वेळच नव्हता”, असेही डॉ. जोशी म्हणाले. केईएमचे माजी अधिष्ठाता व करोनासाठी नेमलेल्या टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक आज करोनाबाधित झाल्याने एका रुग्णालयात उपचारासाठी अतिदक्षता विभागात दाखल आहेत. करोनाच्या रुग्णांवरील उपचाराची दिशा ठरविण्यापासून अनेक महत्वाच्या निर्णयात डॉ. संजय ओक यांचे महत्वाचे योगदान आहे. केवळ मुंबईतीलच नव्हे तर संपूर्ण राज्यातील शासकीय यंत्रणेतील डॉक्टरांना वेबेनारच्या माध्यमातून डॉ. संजय ओक, डॉ. शशांक जोशी यांच्यासह टास्कफोर्सच्या डॉक्टरांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

दरम्यान करोनाच्या लढाईत राज्यातील खाजगी डॉक्टरांचे योगदानही मोलाचे असून आमचे १८ डॉक्टर या लढाईत शहीद झाले तर ९०० हून अधिक डॉक्टरांना करोनाची लागण झाली होती. हे सर्व डॉक्टर आता बरे झाले असून सुमारे १५०० डॉक्टरांना क्वारंटाईन व्हावे लागल्याचे ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ ( आयएमए) चे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी सांगितले. खाजगी डॉक्टरांचे दवाखाने करोनाकाळात बंद असल्याचा आरोप सातत्याने केला जात असून तो चुकीचा असल्याचे डॉ. भोंडवे यांचे म्हणणे आहे. राज्यात दोन लाख डॉक्टर असून यात एक लाख आयुशचे डॉक्टर आहेत. ‘आयएमए’ चे सदस्या असलेल्या एक लाख डॉक्टरांपैकी जवळपास नव्वद टक्के डॉक्टर आपला खासगी व्यवसाय मार्चपासून करत आहेत. जे डॉक्टर साठी पुढील आहेत अथवा कोमॉर्बीड आहेत त्यांना दवाखाने बंद ठेवण्यास त्यांच्या प्रकृतीचा विचार करून आम्हीच सांगितल्याचे डॉ. अविनाश भोंडवे यांचे म्हणणे आहे.

शहीद झालेले आमचे बहुतेक डॉक्टर हे मुंबईतील असून काही पुण्यातील तर एकजण मराठवाड्यातील आहेत. राज्यात ‘आयएमए’ च्या २१६ शाखा असून करोनाचा पहिला रुग्ण केरळला सापडला तेव्हापासून आमच्या संघटनेने राज्य सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केला. आज करोनाचा सामना करण्यासाठी पुरेसे डॉक्टर उपलब्ध होत नसल्याचे सरकार सांगत असले तरी याची सर्वस्वी जबाबदारी आजपर्यंत च्या सर्व सरकारांची आहेत. राज्यात व देशात स्वतंत्र्य काळापासून पुरेशी मेडिकल कॉलेज निर्माण केली नाहीत. महाराष्ट्रातही सरकारी वैद्यकीय महाविद्यालये ज्या प्रमाणात निर्माण होणे गरजेचे होते तसेच मोठी रुग्णालये निर्माण करण्याची गरज असताना कोणत्याही सरकारने यावर ठोस काम केले नाही. आरोग्यावर अर्थसंकल्पाच्या किमान चार टक्के खर्च करणे आवश्यक असल्याचे ‘जागतिक आरोग्य संघटने’ची मार्गदर्शन तत्व असताना एक टक्क्यापेक्षा जास्त खर्च सावर्जनिक आरोग्यावर खर्च केला जात नसल्याकडे ‘डॉक्टर्स डे’ निमित्त डॉ. अविनाश भोंडवे यांनी लक्ष वेधले.

करोनाचा सामना करण्यासाठी खासगी डॉक्टरांना माफक दरात पीपीइ किट व एन ९५ मास्क आदी उपलब्ध करून द्या अशी मागणी ‘आयएमए’ केली होती. आजपर्यंत यावर काही निर्णय झालेला नाही. यावेळचा डॉक्टर्स डे आम्ही ‘आत्मसन्मान दिवस’ म्हणून साजरा करणार आहोत तसेच येत्या १५ ऑगस्ट रोजी शहीद झालेल्या डॉक्टरांचा सरकारने सन्मान करावा, अशी मागणी डॉ. भोंडवे यांनी केली. सरकारने एक आदेश काढून खाजगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र खासगी हॉस्पिटलची व्याख्या स्पष्ट केलेली नाही. मोठी पंचतारांकित व ट्रस्ट हॉस्पिटल तसेच पन्नास व शंभर खाटा असलेली रुग्णालयांमधील खाटा जरूर ताब्यात घ्या पण पाच पंधरा बेड असलेली रुग्णालये तसेच काही स्त्री रुग्णालयातील खाटा ताब्यात घेण्याचे आदेश काढणे हे कोणत्या नियमाच्या आधारे केले जाते हा प्रश्नच आहे, असे डॉ. अविनाश भोंडवे म्हणाले.

मुळात कोव्हीड हॉस्पिटलची व्याख्या स्पष्ट आहे. इन्फेक्शन, व्हेंटिलेशन व प्रशिक्षित कर्मचारी याची किमान व्यवस्था असली पाहिजे. पाच पंधरा बेड असलेल्या रुग्णालयातील ८० टक्के बेड ताब्यात घेऊन हे कसे साधणार असा सवालही त्यांनी केला. करोनाच्या लढाईत आयुश डॉक्टरांचे खाजगी दवाखाने प्रामुख्याने बंद असून सरकारनेच नेमकी माहिती जाहीर करावी असे अॅलोपॅथीच्या काही डॉक्टरांचे म्हणणे आहे. जवळपास दीड लाख आयुश डॉक्टरांना करोना प्रशिक्षण दिल्याचा दावा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केला होता. टोपे यांचा दावा खरा असेल तर आज शासकीय व्यवस्थेत करोना रुग्णांच्या उपचारासाठी डॉक्टर मिळत नाहीत म्हणून चिंता का सुरु आहे, असा सवालही काही अॅलोपॅथीच्या डॉक्टरांनी केला आहे.