१८ जणांचा मृत्यू; बेस्टच्या १४०, तर रेल्वेच्या ७२ कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू

मुंबई : मुंबईतील बेस्ट, रेल्वे अशा सार्वजनिक वाहतुकीतील अनेक कर्मचाऱ्यांना करोनाचा विळखा बसला आहे. आतापर्यंत रेल्वे आणि बेस्टच्या मिळून १८ कर्मचाऱ्यांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. यात रेल्वेच्या दहा कर्मचाऱ्यांचा समावेश असून उर्वरित कर्मचारी बेस्टचे आहेत. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या ७२ कर्मचाऱ्यांवर, तर बेस्टच्या १४० कर्मचाऱ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांवर जगजीवनराम रुग्णालयातच उपचार सुरू असून करोनाची लागण झालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये मध्य रेल्वेवरील सर्वाधिक कर्मचारी आहेत.

बेस्टकडून मुंबई शहर व उपनगरात अत्यावश्यक सेवा दिली जात आहे. यात चालक-वाहक हे प्रवाशांच्या संपर्कात येत असतात. त्यामुळे करोनाचा धोका त्यांना जास्त संभवतो. त्यामुळे खबरदारीचे उपाय म्हणून त्यांना मास्क, हॅण्डग्लोज देण्याबरोबरच बसमधील त्यांच्या आसनाजवळ प्लास्टिक शिट्सही बसवण्यात आले आहेत. तरीही करोनाच्या विळख्यातून चालक-वाहकही सुटू शकलेले नाहीत. याशिवाय यांत्रिकी कर्मचारी, बेस्टच्या विद्युत विभागातील कर्मचाऱ्यांनाही लागण झाली आहे. आतापर्यंत ३१९ कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाल्याची नोंद असून यात आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १७१ जणांवर उपचार करून घरी सोडण्यात आले. त्यामुळे अद्यापही १४० जणांवर पालिका व खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बेस्टमधील मृत कर्मचाऱ्यांचा

आकडा हा जास्त असल्याचे बेस्टमधील कर्मचारी संघटनांकडून सांगितले जात असले तरीही प्रत्यक्षात आठच असल्याचे बेस्ट प्रशासन सांगत आहे.

बेस्टपाठोपाठ मध्य आणि पश्चिम रेल्वेतील कर्मचाऱ्यांनाही करोनाची लागण झाली असून ७२ जणांवर रेल्वेच्या जगजीवनराम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यामध्ये मध्य रेल्वेवरील ४१ आणि पश्चिम रेल्वेवरील ३१ कर्मचारी असल्याची माहिती रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. मंगळवारी १८ कर्मचारी रुग्णालयात दाखल झाले. यामध्येही १६ कर्मचारी मध्य रेल्वेवरीलच आहेत.  रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, दहा कर्मचाऱ्यांचा मृत्यू करोनामुळे झाला असून यात  आठ कर्मचारी मध्य रेल्वेचे आणि दोन कर्मचारी पश्चिम रेल्वेचे आहेत.

आणखी ४९ संशयितांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयातून उपचार घेऊन बाहेर पडणाऱ्यांची संख्या आता वाढत आहे. मे २१ पर्यंत ९५ कर्मचाऱ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू होते. आता हा आकडा आणखी कमी झाला आहे.

गर्दीतल्या प्रवासामुळे धोका

रेल्वेकडून विशेष कर्मचारी गाडय़ा सोडण्यात आल्या असून सोमवापर्यंत त्यांच्या दिवसभरात सहा फे ऱ्या होत होत्या. मात्र असलेल्या गर्दीमुळे मधल्या स्थानकातील कर्मचाऱ्यांना या गाडय़ांत प्रवेश करता येत नसल्याने रेल्वे कर्मचाऱ्यांनी आंदोलन के ले होते. गर्दीतल्या या प्रवासामुळेही करोनाचा धोका संभवू शकतो.