केरळहून ३० डॉक्टरांसह १० परिचारिका सेव्हनहिल्स येथील अतिदक्षता विभागात कार्यरत झाल्यानंतर आणखी १८ परिचारिका मुंबईला येणार आहेत.

रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता वैद्यकीय शिक्षण विभागाने केरळ सरकारकडे डॉक्टर आणि परिचारिका पाठविण्याची मागणी केली होती. त्यानुसार तिरुवनंतपुरम वैद्यकीय महाविद्यालयाचे उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. संतोष कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ३० डॉक्टर मुंबईत आले आहेत. यात चार तज्ज्ञ डॉक्टर असून इतर एमबीबीएस डॉक्टरांचा समावेश असून यांच्यासोबतच आलेल्या दहा परिचारिकांना अतिदक्षता विभागातील कामाचा अनुभव आहे.

या डॉक्टरांची नेमणूक सेव्हनहिल्स रुग्णालायतील अतिदक्षता विभागात केली आहे. येथे सध्या १०० खाटांचा अतिदक्षता विभाग असून याची क्षमता २०० पर्यत वाढविण्यात येणार असल्याचे पालिकेने विशेष नियुक्ती केलेल्या एन. रामास्वामी यांनी सांगितले. मुंबईत आणखी परिचारिका आणण्याचा प्रयत्न सुरू असून सध्या वाहतूकीची मोठी अडचण येत आहे. परंतु लवकरच आणखी १८ परिचारिका मुंबईत येणार आहेत.

अतिदक्षता रुग्णालयांची आवश्यकता

सध्या गंभीर रुग्णांची संख्या अधिक असून त्या तुलनेत खाटा अपुऱ्या असल्याने अधिक क्षमतेच्या खाटांच्या रुग्णालयांपेक्षाही खास करोना रुग्णालयांप्रमाणे केवळ अतिदक्षता रुग्णालये उभारण्याची अधिक गरज आहे. छोटय़ा रुग्णालयांमधील उपलब्ध मनुष्यबळ वळवून, योग्य रितीने नियोजन आणि साधनसामुग्री तातडीने उपलब्ध करत ५०० किंवा एक हजार खाटांची अतिदक्षता रुग्णालये उभारण्यावर भर देणे गरजेचे आहे. संबंधित मंत्र्यांशी याबाबत चर्चा करणार असल्याचे डॉ. कुमार यांनी सांगितले.