नालेसफाई घोटाळ्याप्रकरणी मुंबई महापालिकेच्या १८ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात येण्याची शक्यता आहे. नालेसफाई घोटाळ्याच्या चौकशीचा अहवाल संजय देशमुख समितीने मंगळवारी रात्री पालिका आयुक्त अजय मेहता यांना सादर केला. या अहवालात ३० हून अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांवर दोषारोप ठेवण्यात आला आहे.

नालेसफाई घोटाळ्याच्या चौकशी अहवालात घनकचरा विभाग, मलनि:सारण विभाग, दक्षता विभागातील सहाय्यक अभियंता, दुय्यम अभियंता आणि अन्य कर्मचारी अशा १८ अधिकारी व कर्मचाऱ्यांवर दोषाचा ठपका ठेवण्यात आला आहे. यांपैकी १४ अधिकारी व कर्मचाऱ्यांना यापूवीच निलंबित करण्यात आले आहे.
या चौकशी अहवालात कंत्राटदाराने केवळ ४० कामे केल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे २३ कंत्राटदारावर कायदेशीर कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांसह कंत्राटदारांचीही पाचावर धारण बसली आहे. याशिवाय दोषी कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. दोषी आढळलेल्या अधिकाऱ्यांची गय केली जाऊ नये, असे आदेश पालिका आयुक्तांनी खाते प्रमुखांना दिले आहेत.