गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्यांकरिता आज, १५ ऑगस्टपासून १८२ विशेष फेऱ्या चालविण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. रेल्वे प्रवासाकरिता करोना चाचणी बंधनकारक नसल्याने एसटीने जाणारा प्रवासीवर्गही रेल्वेकडे वळण्याची शक्यता आहे.

१३ ऑगस्टनंतर एसटीने कोकणात जाणाऱ्यांना प्रवासाआधी करोना चाचणी बंधनकारक आहे. त्यामुळे अनेक प्रवाशांनी एसटी प्रवासाकडे पाठ फिरवली आहे. दुसरीकडे रल्वे प्रवासाआधी प्रवाशांचे केवळ थर्मल स्क्रिनिंग केले जाणार आहे. मात्र, प्रवाशांनीप्रवासादरम्यान सर्व नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. असे असले तरी कोकणात गेल्यानंतर या प्रवाशांचा विलगीकरणाचा प्रश्न उद्भवू शकतो.

मध्य रेल्वेवरील विशेष गाडय़ांचे आरक्षण १५ ऑगस्टपासून आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर सुरू होईल. पश्चिम रेल्वेवरील गाडय़ांचे आरक्षण १६ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. दरवर्षी गणपतीत विशेष गाडय़ांसाठी नियमित गाडय़ांपेक्षा अधिक भाडे आकारले जाते. यंदाही विशेष भाडेदरच आकारले जातील.

दरड कोसळल्यामुळे..

मध्य रेल्वेच्या १६२ आणि पश्चिम रेल्वेच्या २० फेऱ्या धावतील. विशेष गाडय़ा रत्नागिरी, कुडाळ, सावंतवाडीपर्यंतच आहेत. पेडणे येथे बोगद्याजवळ दरड कोसळल्यामुळे पुढचा मार्ग बंद आहे. पेडणे, थिवी, करमळी, मडगावपर्यंत जाणाऱ्यांना पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे.

परतीच्या प्रवासावेळी गर्दीची शक्यता

गणेशोत्सव साजरा करण्यासाठी कोकणात जाणाऱ्यांना विलगीकरण बंधनकारक आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांत अनेकांनी मुंबई, ठाणे जिल्ह्य़ासह अन्य भागांतून खासगी बस आणि वाहनाने गाव गाठले. त्यामुळे परतीच्या प्रवासाकरिता या रेल्वे गाडय़ांना चांगला प्रतिसाद मिळू शकेल. शिवाय होळीनिमित्त गेलेले अनेकजण परतीच्या प्रतीक्षेत आहेत.